Chandrapur News | आठवडाभरात दुसऱ्यांदा ‘आप’ची धाड; गॅस सिलेंडरमधून २ किलो गॅस काढल्याचा आरोप

वृंदावननगरातील गोदामात ६० सिलेंडर आढळले; पुरवठा विभाग, तहसील प्रशासन व पोलिसांची घटनास्थळी धाव
AAP Raid Chandrapur
AAP Raid ChandrapurPudhari
Published on
Updated on

AAP Raid Chandrapur

चंद्रपूर : घरगुती गॅस सिलेंडर निर्धारित वजनापेक्षा कमी मिळत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी वृंदावननगर परिसरातील एका गोदामावर अचानक धाड टाकली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडर आढळून आले असून, प्रत्येक सिलेंडरमधून सुमारे दोन किलो गॅस काढून घेतला जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. कारवाईची माहिती मिळताच पुरवठा निरीक्षक, तहसील प्रशासन आणि दुर्गापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना निर्धारित वजनापेक्षा कमी गॅस मिळत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. यापूर्वी सुमारे सात दिवसांपूर्वी कोसारा येथील एका गोदामावर धाड टाकण्यात आली होती. त्यावेळीही कमी वजनाचे सिलेंडर आढळल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला असून, त्या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती.

AAP Raid Chandrapur
Chandrapur News | चंद्रपुरात आमदार जोरगेवार यांच्या कुटुंबीयांच्या खासगी जागेवरील संरक्षक भिंत महापालिकेने पाडली

वृंदावननगरातील गोदामात सिलेंडरचा साठा

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वृंदावननगरातील संशयित गोदामावर अचानक धाड टाकली. या ठिकाणी परराज्यातील मजूर गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीचे काम करत असल्याचे आढळल्याचा दावा पक्षाने केला आहे. पुढील तपासणीदरम्यान हे गोदाम गोपिका गॅस एजन्सीशी संबंधित असल्याचे समोर आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

गोदामातील एका खोलीत एकूण ६० सिलेंडर आढळून आले. याशिवाय विविध कंपन्यांचे व्यावसायिक गॅस सिलेंडरही आढळले. संबंधित सर्व सिलेंडरचे वजन तपासण्यात आले असून, काही सिलेंडर निर्धारित मानकांपेक्षा कमी वजनाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. सिलेंडरचे सिरीयल क्रमांक, ग्रॉस वजन आणि नेट वजन यांची नोंद पंचनाम्यात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

AAP Raid Chandrapur
Chandrapur News | माढेळीचा पशुवैद्यकीय दवाखाना ‘शोभेची वास्तू’; उपचाराअभावी पशुपालक त्रस्त

रोख रक्कम व कागदपत्रेही आढळली

कारवाईदरम्यान गोदामात रोख रक्कम, काही कागदपत्रे आणि इतर साहित्य आढळून आल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. या सर्व बाबींची नोंद पोलिसांकडून घटनास्थळी करण्यात आलेल्या पंचनाम्यात करण्यात आली आहे.

शहरात मोठे रॅकेट असल्याचा दावा

कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीने चौकशीदरम्यान शहरातील इतर काही गॅस एजन्सींमध्येही अशाच पद्धतीने सिलेंडरमधून गॅस काढून कमी वजनाचे सिलेंडर ग्राहकांना पुरवले जात असल्याची माहिती दिल्याचा दावा पक्षाने केला आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका गोदामापुरते मर्यादित नसून शहरात मोठ्या प्रमाणावर असे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता आम आदमी पक्षाने व्यक्त केली आहे.

AAP Raid Chandrapur
Chandrapur News | मृत कुत्रा नाही उचलला; संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाज्यावरच टांगला

‘गैरव्यवहार खपवून घेणार नाही’

सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित वस्तूंमध्ये गैरव्यवहार करून ग्राहकांची फसवणूक होत असल्यास ते कदापि खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका आम आदमी पक्षाने व्यक्त केली. कमी वजनाच्या सिलेंडरमुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक तर होतेच; मात्र अनधिकृत पद्धतीने गॅस काढणे अथवा रिफिलिंग केल्यास सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

या कारवाईवेळी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील मुसळे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, जिल्हा पदाधिकारी विशाल बिरमवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकरणाचा पुढील तपास संबंधित प्रशासन व पोलिसांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news