

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शिकारीच्या प्रयत्नात असताना विहिरीत पडून वाघाचा मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गोविंदपूर शेतशिवारात आज रविवारी सकाळी उघडकीस आली. दोन दिवसांपूर्वीच वाघ विहिरीत पडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. Chandrapur
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील गोविंदपूर शेतशिवारात काही शेतकऱ्यांना वाघ विहिरीत मृतावस्थेत आढळून आला. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. लगेच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दुपारपर्यंत वाघाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाने घटनास्थळी येवून रेस्कू सुरू केला होता. दोन दिवसांपूर्वीच वाघ विहिरीत पडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्याने शिकार करण्याचा प्रयत्न केला, त्यातच तो विहिरीत पडला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ज्या विहिरीत वाघ पडला. त्या विहिरीला तोंडी नाही. दुपारपर्यंत त्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी रेस्कू सुरु होते. शेतशिवारातील विहिरींना तोंडी नसल्याने अनेक ठिकाणी वन्यप्राणी मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटना घडत आहेत.
हेही वाचा