

चंद्रपूर : तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन आनंद प्रफुल जोगी (वय १८) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२५) कोरपना तालुक्यातील सावलहिरा गावात सकाळी ११ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मृत आनंद हा प्रफुल जोगी यांचा एकुलता एक मुलगा असून त्यांनी जगदीश धोटे यांच्या मालकीचे शेत ठेकेदारी पद्धतीने घेतले होते. मंगळवारी झालेल्या वादळामुळे या शेतात विद्युत खांब पडला आणि विजेच्या तारा लोंबकळत राहिल्या. बुधवारी सकाळी ११ वाजता आनंद टीबन्याच्या कामासाठी शेतात गेला. मंगळवारी वादळामुळे विद्युत पुरवठा खंडित असल्याचे गृहीत धरून त्याने काम सुरू केले. यादरम्यान तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ पोलीस यंत्रणेला माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणाचा तपास कोरपना पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.