

चंद्रपूर : मुल पोलिस स्टेशन अंतर्गत 109 प्रकरणात आतापर्यंत कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला सुमारे 18 लाखाचा दारूसाठी तालुक्यातील बोरचांदली येथील जंगलात आज मंगळवारी (१२ मार्च, २०२५) नष्ट करण्यात आला.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात जिल्ह्यात पोलीस ठाणे मधील जप्त मुद्देमालाचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहीमे अंतर्गत पोलीस ठाणे मुल येथील प्रभारी अधिकारी प्रमोद चौगुले, परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक यांनी पोलीस ठाणे मुल येथील दारुबंदी कायद्यांतर्गत जप्त केलेला २०२३-२०२४ या कालावधी मधील १०९ प्रकरणातील अवैध देशी-विदेशी दारुचा मुद्देमाल नष्ट करण्यासाठी अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी मागितली. त्यांचेकडील प्राप्त आदेशान्वये आज मंगळवारी (१२ मार्च, २०२५) रोजी पोलीस ठाणे मुल हद्दीतील चांदली (बुर्ज) रोडवरील झुडपी जंगलाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक संदीप राऊत यांचे उपस्थित प्रमोद चौगुले, परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक, प्रभारी ठाणेदार यांनी रोड रोलरच्या सहाय्याने अवैध देशी-विदेशी दारु नष्ट केली.