

Chandrapur Madanapur Boy Snakebite
चंद्रपूर: चिमूर तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या लगत असलेल्या मदनापूर गावात सापाच्या दंशामुळे शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अंश मंगेश कामडी (वय १२) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मदनापूर येथे सहाव्या वर्गात शिक्षण घेत होता.
ही घटना २५ जूनच्या मध्यरात्री घडली. अंश आपल्या घरात खाटेवर झोपला असताना अंदाजे रात्री १ वाजताच्या सुमारास त्याची तब्येत अचानक बिघडली. सकाळी अंशने छाती जड असल्याची माहिती आपल्या आई, वडील आणि आजीला दिली. तत्काळ त्याला चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर नागपूरला हलविण्याचा करण्याचा सल्ला दिला. मात्र प्रकृती खालावल्याने त्याला पुन्हा चिमूर येथीलच रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी अंशला मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, विषारी सापाच्या दंशामुळे अंशचा मृत्यू झाल्याचे कारण समोर येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, अंशच्या अचानक जाण्यामुळे शाळा, शिक्षक, मित्रमंडळी व ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.