

चंद्रपूर : मूल येथील एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. रोहीत शेंडे (वय 28) असे मृत्ताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२७) रात्री दहा वाजताच्या सुमारास पंचायत समिती जवळ घडली. या घटनेमुळे मूल शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी आरोपींना अटक करण्याची तीव्र मागणी पोलिसांकडे केली आहे.
शुक्रवारी रात्री रोहीत शेंडे हा पंचायत समिती जवळ असलेल्या नगर पालिकेच्या बस थांबा शेड मध्ये बसला होता. त्या ठिकाणी चार युवकांनी येवून त्याच्यासोबत वाद घातला. त्यानंतर चाकूने पोटावर आणि पाठीवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहीतला काही नागरिकांनी मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना समजताच रात्री नागरिकांनी घटनास्थळी आणि पोलिस ठाण्यात गर्दी केली. मूल मध्ये या घटनेने खळबळ उडाली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ मूल मध्ये आज कडकडीत बंद पुकारण्यात आला. या घटनेनंतर मूलमध्ये पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. दंगा नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आले आहे. उपजिल्हा रूग्णालय आणि गांधी चौकात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे. या वर्षातील मूल मधील ही दुसरी हत्या आहे.