

75 Years of Anandwan: समाजाने ज्यांना वाळीत टाकलं, ज्यांच्या स्पर्शालाही लोक घाबरत होते, अशा कुष्ठरुग्णांसाठी एका माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं. त्या माणसाचं नाव होतं बाबा आमटे. आज त्यांच्या स्वप्नातून उभ्या राहिलेल्या आनंदवनाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. एका झाडाखाली अवघ्या 14 रुपयांत हा प्रवास सुरु झाला होता.
जगण्यात दोन मार्ग असतात. एक म्हणजे जे चाललंय ते चालू द्यायचं आणि स्वतःपुरतं आयुष्य जगायचं. दुसरा म्हणजे समाजातील वेदना ओळखून त्या बदलण्यासाठी उभं राहायचं. बाबा आमटे यांनी दुसरा मार्ग निवडला आणि म्हणूनच त्यांचं आयुष्य लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान बनलं.
26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्ह्यातील एका संपन्न कुटुंबात मुरलीधर देवीदास आमटे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील ब्रिटिश काळातील वरिष्ठ अधिकारी आणि मोठे जमीनदार होते. संपत्ती, प्रतिष्ठा आणि ऐशोआराम यांची कोणतीही कमतरता त्यांच्या आयुष्यात नव्हती. लहानपणापासूनच त्यांना शिकार, महागड्या गाड्या आणि सुखसोयी असलेलं आयुष्य मिळालं होतं. मात्र, त्यांचं मन या चौकटीत कधीच अडकून राहिलं नाही.
घरात सर्वजण त्यांना प्रेमाने ‘बाबा’ म्हणत. पुढे हेच नाव संपूर्ण देशाला परिचित झालं. वर्धा येथे त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि यशस्वी वकील म्हणूनही काम केलं. पण एका घटनेने त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं.
महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला. समाजातील दुर्लक्षित आणि उपेक्षित लोकांसाठी काहीतरी करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यावेळी कुष्ठरोग असणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकला जायचा. कुष्ठरुग्णांना कुटुंब आणि समाज दोन्हीकडून दूर केलं जात होतं. त्यांना उपचार, सन्मान आणि जगण्याचा अधिकारही नाकारला जात होता.
ही परिस्थिती पाहून बाबा आमटे अस्वस्थ झाले. त्यांनी ठरवलं की, ज्या लोकांना समाजाने नाकारलं आहे, त्यांच्यासोबतच आयुष्य घालवायचं. आणि 1948 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे एका झाडाखाली 'आनंदवन' या आश्रमाची सुरुवात झाली. या कार्यासाठी त्यांच्याकडे भांडवल होतं ते फक्त 14 रुपये.
सुरुवातीच्या काळात बाबा आमटे यांच्यासोबत त्यांची पत्नी साधनाताई, दोन लहान मुले आणि सहा कुष्ठरुग्ण होते. या छोट्याशा परिवाराने समाजसेवेचा एक नवा इतिहास घडवण्यास सुरुवात केली.
आनंदवन हे केवळ आश्रम नव्हतं; ते स्वाभिमानाचं, आत्मनिर्भरतेचं आणि माणुसकीचं केंद्र बनलं. येथे रुग्णांना फक्त औषधोपचार दिले गेले नाहीत, तर त्यांना रोजगार, शिक्षण आणि सन्मानाने जगण्याची संधीही मिळाली. बाबा आमटे यांचा विश्वास होता की दया नव्हे, तर संधी माणसाचं आयुष्य बदलते.
या संपूर्ण प्रवासात साधनाताई आमटे यांची साथ अमूल्य ठरली. त्यांनीही बाबा आमटे यांच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात खांद्याला खांदा लावून काम केलं. त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. विकास आमटे यांनीही आई-वडिलांचा वारसा पुढे नेला. आजही ते आदिवासी, गरीब आणि गरजू लोकांसाठी अविरतपणे कार्य करत आहेत.
एका झाडाखाली सुरू झालेलं आनंदवन आज तब्बल 250 एकर परिसरात विस्तारलं आहे. येथे दोन रुग्णालये, विद्यापीठ, अनाथालय, मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि विविध पुनर्वसन केंद्रे कार्यरत आहेत. कुष्ठरुग्णांसह विविध दिव्यांग व्यक्तींसाठीही येथे उपचार आणि पुनर्वसनाची व्यवस्था आहे.
बाबा आमटे यांच्या कार्याची दखल केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात घेण्यात आली. त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे, टेम्पलटन पुरस्कार आणि गांधी शांतता पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मानांनी गौरविण्यात आले.
2007 मध्ये त्यांना ल्युकेमियाचा आजार झाला. वर्षभराच्या संघर्षानंतर 9 फेब्रुवारी 2008 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांचं कार्य आजही जिवंत आहे. आनंदवन हे त्यांचं सर्वात मोठं स्मारक आहे.
आज आनंदवनाच्या 75 वर्षांच्या प्रवासाकडे पाहताना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, एखाद्या व्यक्तीची इच्छा आणि समाजासाठीची तळमळ किती मोठा बदल घडवू शकते. 14 रुपयांत सुरू झालेलं हे स्वप्न आज हजारो लोकांच्या आयुष्यात आनंद, आत्मविश्वास आणि नवी आशा निर्माण करत आहे. आनंदवनाची 75 वर्षे ही केवळ एका संस्थेची कहाणी नाही, तर माणुसकीची गाथा आहे.