

चंद्रपूर : चंद्रपूर येथील प्रादेशिक परिवहन विभागातील सहायक मोटर निरीक्षक व एका खासगी कर्मचाऱ्याला 500 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. चंद्रपुरातील तेलंगणा सीमेवर असलेल्या लक्कडकोट आरटीओ चेकपोस्टवर अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा तेलंगणातील आदिलाबाद येथील असून त्याचे ट्रक आदिलाबाद ते चंद्रपूर या मार्गावर नियमित चालतात. घटनेच्या वेळी कर्तव्यावर सहायक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी विभुते आणि त्याचा खासगी कर्मचारी जगदीश डफडे उपस्थित होते. यावेळी तेलंगणा सीमेवर ट्रकला थांबवून कागदपत्रांची त्यांनी तपासणी केली. सर्व कागदपत्रे बरोबर असताना व गाडीचे वजन बरोबर असतानाही एन्ट्रीच्या नावाखाली 500 रुपये लाचेची मागणी त्यांनी केली. वारंवार हा प्रकार या ठिकाणी सुरू असल्यामुळे तक्रारदारानी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागत तक्रार दाखल केली. ही रक्कम देण्याचे ट्रक चालकाने मान्य करून 500 रुपये दिले. चंद्रपुरातील तेलंगणा सीमेवर असलेल्या लक्कडकोट आरटीओ चेकपोस्टवर अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे स्वीकारताना सहायक मोटर निरीक्षक शिवाजी विभुते व खाजगी कर्मचारी जगदीश डफडे याला 500 रुपयांची लाच घेताना अटक केली.
सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक व खाजगी कर्मचाऱ्याला ताब्यात घेत्यानंतर त्यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता कार्यालयात 56 हजार रुपये सापडले आहेत. या रक्कमेबाबत त्यांनी कुठलेही सबळ स्पष्टीकरण न दिल्याने हे पैसेही जप्त करण्यात आले आहेत. ही संपूर्ण कारवाई अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चंद्रपुरात केल्याने चंद्रपूर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
दरम्यान, याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लक्कडकोट येथे आरटीओ आंतरराज्यीय चेकपोस्ट आहे. मालवाहू वाहनांची मोठी वाहतूक या मार्गावरून होते. या वाहनधारकांना लुटण्याचे प्रकार इथे नियमित होत असल्याच्या तक्रारी आहेत.