

चंद्रपूर : भाजप नेते नितेश राणे यांनी मुस्लिमांना गरबा उत्सवात प्रवेश देऊ नये, अशी भूमिका मांडल्यानंतर या मुद्द्यावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. गरबा हा सर्वसमावेशक उत्सव असून, एखादा मुस्लिम व्यक्ती गरबा पाहण्यासाठी किंवा त्याचा आनंद घेण्यासाठी येत असेल, तर त्यात काहीही गैर वाटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
गरबा उत्सवाबाबत बोलताना अमृता फडणवीस यांनी सर्वसमावेशकतेवर भर दिला. उत्सवाच्या माध्यमातून आनंद आणि सहभागाची भावना निर्माण होत असेल, तर त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे गरब्यात मुस्लिमांच्या सहभागाला विरोध करण्याची भूमिका त्यांनी मान्य केलेली नाही.
दहीहंडीतील महिलांचा सहभाग समानतेचे प्रतीक
दरम्यान, संभाजीराव भिडे यांनी दहीहंडी उत्सवातील महिलांच्या सहभागाबाबत घेतलेल्या भूमिकेवरही अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. महिला मनोरा तयार करून दहीहंडीत सहभागी होत असतील, तर ते समानतेचे लक्षण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, महिलांना केवळ मनोरंजनाच्या नावाखाली वेडेवाकडे नाच करण्यास लावणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले. ज्या ठिकाणी जे योग्य आहे, तेच केले पाहिजे, अशी भूमिका अमृता फडणवीस यांनी मांडली.