चंद्रपूर : बोरचांदोली येथील गुराखी सोमवारी (दि.30) जनावरे चारायला घेऊन गेलेल्या एका गुराख्याने वाघाच्या भितीने जिव वाचविण्यासाठी नदीच्या पात्रामध्ये उडी मारली. जनावराच्या सहाय्याने नदी पार करीत असताना खोल पाण्यात गेला आणि पाण्याचा अंदाज न लागल्याने गुराख्याचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी (दि.1) गुराख्याचा मृतदेह मिळाला. शैलेश कटकमवार (रा.बोरचांदोली) असे मृत गुराख्याचे नाव आहे.
बोरचांदली येथील गुराखी शैलेश कटकमवार हा जनावरे चारण्यासाठी नदी परिसरात गेला होता. जनावरे चरत असताना दुपारच्या सुमारास जनावरांना वाघ दिसल्याने ते बिथरले. यानंतर जनावरे सैरावैरा नदीत पळत सुटली. जनावरांच्या बिथरल्याने गुराखी शैलेशही घाबरला. त्यालाही वाघ असल्याची चाहूल लागली. त्यामुळे तो थेट नदीपात्रात पळत सुटला. नदीत पाणी होते. जनावरे पाण्यातून मार्ग काढत होते. तर गुराखी जिव वाचविण्यासाठी नदीत धडपडत होता. अखेर त्याने म्हैशीच्या सहाय्याने पाण्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. म्हशीला पकडून पाण्यातून बाहेर पडत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याचा तौल गेला आणि नदीत बुडाला.
यावेळी काही गुराख्यांना हा प्रकार आढळून आला. अन्य गुराखी आपआपली जनावरे सोबत घेवून नदी काठाने सुखरूप बाहेर पडले. मात्र शैलेशचा बुडून मृत्यू झाला. अन्य गुराख्यांनाही वाघ दिसल्याचे ते थेट जनावरे घेऊन जिव वाचवित घराच्या दिशने निघाले. घरी येताच त्यांनी ही घटना गावात सांगितली. पोलिसांना माहिती देण्यात आली. लगेच गावक-यानी शोधमोहिम सुरू केली. सायंकाळ पर्यंत त्याचा मृतदेह सापडला नाही. चंद्रपूर येथील आपत्ती व्यवस्थापनाच्या चमूला पाचारण करण्यात आले. त्यांनी येऊन शोधाशोध केली परंतु मृतदेह आढळून आला नाही. नदी पात्रातील पाण्यात लाकडाच्या ओंडक्याला याचा मृतदेह अडकून होता. काल मंगळवारी सकाळी साडे नऊ सुमारास गुराख्याचा मृतदेह आढळूनआला. वाघाच्या भितीने नदीपात्रातून जिव वाचविण्यासाठी गेलेल्या गुराख्याचा बुडून मृत्यू झाल्याने बोरचांदली गावात हळहळ व्यक्त होत आहे.