चंद्रपूरात १६ आमदारांच्या निकालानंतर ठाकरे गट आक्रमक, काळे झेंडे दाखवत आंदोलन | पुढारी

चंद्रपूरात १६ आमदारांच्या निकालानंतर ठाकरे गट आक्रमक, काळे झेंडे दाखवत आंदोलन

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज बुधवारी निकाल देऊन सोळा आमदारांना पात्र घोषीत केल्यानंतर चंद्रपुरात शिवसेना (ठाकरे) गट आक्रमक झाला आहे. शिवसेना (ठाकरे) गटाने काळे झेंडे हातात घेऊन आंदोलन करीत केंद्र सरकार, शिंदे गट व नार्वेकरांचा जाहीर केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आठ महिण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह विधानसभेच्या सोळा आमदारांना पात्र अपात्र घोषीत करण्याविषयी निकाल दिल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांकडे निर्णय देण्याकरीता प्रकरण सोपविले होते. दोन महिण्यात कालावधीत निकाल देण्याचे सुप्रिम कोर्टाने सांगितले होते. कालावधी दिल्यानंतरही तब्बल आठ महिण्यानंतर आज बुधवारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे वाचन केले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल देऊन शिंदे गटाचे सोळाही आमदार पात्र घोषीत केल्याचा निकाल दिला. या निकालाच्या विरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनिकांमध्ये प्रचंड प्रचंड रोष निर्माण झाला आहे. निकालानंतर आज बुधवारी चंद्रपूरात शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक होऊन हातात काळे झेंडे घेऊन आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार, शिवसेना शिंदे गट व विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांचया विरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे व असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत संविधान पदावर बसलेले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाजपाच्या इशारावरून शिंदेगटाला वाचविण्याकरीता त्यांच्या बाजूने निकला दिल्याचा आरोप केला आहे. देशभरात केंद्र सरकार हुकूमशाही आणू पहात आहे, असा आरोप करीत सोळा आमदारांना अपात्र होण्यापासून वाचविणाऱ्या निकालाचा जाहीर निषेध व्यक्त केला. वृत्त लिहीपर्यंत चंद्रपूरात शिवसेना (ठाकरे ) गटाचे आंदोलन सुरू आहे.

Back to top button