चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चींधीचकच्या सरपंचावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता काम करणे, विकास कामांकडे दुर्लक्ष करणे, गावात न राहणे शिवाय मनमानी कारभाराचा आरोप ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांकडून करण्यात आला आहे. नागभीड तालुक्यातील चिंधीचकच्या सात ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच रवींद्र सुर्यभान गायकवाड यांचेवर ३ नोव्हेंबरला नागभिडचे तहसीलदार यांचेकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याने गायकवाड यांच्या सरपंच पदावर सध्या टांगती तलवार आहे.
नागभिड तालुक्यातील चिंधीचक ही नऊ सदस्य संख्या असेलेली ग्राम पंचायत आहे. येथे २०२१ मध्ये निवडणूक झाली होती. त्यावेळी सरपंच पदावर रवींद्र सुर्यभान गायकवाड हे सरपंच पदावर विराजमान झाले. कालांतराने एका सदस्याने राजीनामा दिल्याने सध्या एक जागा रिक्त असल्याने आठच सदस्य कार्यरत आहेत. गायकवाड हे सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, बाहेर गावी राहून कामकाज करणे, विकास कामे वेळेवर न करणे, विकास कामांकडे दुर्लक्ष करणे, मनमानी कारभार करून कामे करणे, मासिक सभेत घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी न करणे, मासिक हिशेब न देणे आदी कारणांमुळे नागभिडचे तहसीलदार मनोहर चव्हाण यांचेकडे सात ग्राम पंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.
तहसीलदार यांनी ९ नोव्हेंबरला विशेष सभेचे आयोजन करून अविश्वास ठराव मांडण्याबाबत ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस बजावून उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे विद्यमान सरपंच रविंद्र गायकवाड यांच्या सरपंच पदावर टांगती तलवार आहे. गुरूवारी विशेष सभेत सरपंच पदावर अविश्वास ठराव पारीत होतो किंवा बारगळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.