चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणूक; जिल्ह्यात काँग्रेस आघाडीवर; ठाकरे गट २ तर भाजप एका जागेवर विजयी | पुढारी

चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणूक; जिल्ह्यात काँग्रेस आघाडीवर; ठाकरे गट २ तर भाजप एका जागेवर विजयी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : रविवारी (दि. ५) चंद्रपूर जिल्ह्यात 8 सार्वत्रिक तर 58 ग्राम पंचायतीमध्ये पोटनिवडणूक पार पडली. आज (दि. ६, सोमवारी)  मतमोजणीत आलेल्या निकालात काँग्रेसने 3, भाजप 1, शिवसेना (ठाकरे गट) 2 तर 2 ग्राम पंचायतीमध्ये स्थानिक पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. उल्लेखनिय म्हणजे सावली मधील साखरी ग्राम पंचायतीमध्ये झालेल्या पोटनिवडणूकीत काँग्रेसचे निलेश पेंदोर विजयी झाले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात काल रविवारी 8 ग्राम पंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यामध्ये राजूरा तालुक्यात सर्वात जास्त 3 ग्रामपंचायत, वरोरा येथे 2, ब्रम्हपूरी 1, सावली 1, जिवती 1 ग्राम पंचायतीचा समावेश होता. आज सोमवारी सकाळी दहावाजतापासून मतमोजणी करण्यात आली. हाती आलेल्या निकालामध्ये काँग्रेस 8 पैकी राजूरा तालुक्यातील आर्वी, सावली तालुक्यातील मोखाडा तर वरोरा तालुक्यातील सालोरी येथे सरपंचपदावर विजय मिळविला आहे. आर्वीमध्ये सरपंचासह 9 जागा तर सावलीतील मोखाडा येथे सरपंचासह 8 जागावर विजय मिळविला. आर्वीमध्ये सुरज माथनकर, मोखाडा मध्ये प्रणिता मशाखेत्री, तर सालोरी मध्ये प्रतिभा शेरकुरे सरपंच पदावर विजयी झाल्या. काँग्रेसपाठोपाठ दोन ग्राम पंचायतीमध्ये शिवसेना (ठाकरे गट) ची जादू चालली. राजुरा तालुक्यातील आर्वीमध्ये सरपंचासह 11 जागावर शेतकरी संघटना व शिवसेना(ठाकरे गट) युतीने विजय मिळविला. यामध्ये सेनेच्या निकीता झाडे सरपंचपदावर विजयी झाल्या.
वरोरा तालुक्यातील अर्जूनी येथे स्थानिक पॅनलचे आणि शिवसेना समर्थनाचे सोनू विकास हनवते विजयी झाले. राजूरा तालुक्यातील सास्ती येथे भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे्. यामध्ये भाजपने सरपंचासह 10 जागा ताब्यात घेऊन बहूमत मिळविला आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील कहाली येथे सरपंच पदावर अश्विनी अशोक राऊत ह्या सरपंच पदावर विजयी झाल्या. त्यांचे ग्राम विकास आघाडीचे 7 सदस्य विजयी झाले. ह्या पैकी दोन सदस्य हे अविरोध निवडून आले. मागील वेळी शुध्दा त्यांचीच सत्ता होती. यावेळी पुन्हा त्यांनी सत्ता ताब्यात घेतली. जिवती तालुक्यातील शेडवाही येथे अपक्षांचा बोलबाला राहिला आहे. शित्रू भिमराव सिडाम हे अपक्ष उमदेवार सरपंचपदावर विजयी झाले आहेत. सावली तालुक्यातील साखरी येथे सरपंचपदासाठी पोट निवडणूक पार पडली. यामध्ये काँग्रेसचे निलेश पेदोंर विजयी झाले.
चंद्रपूर जिल्ह्यात 8 पैकी एका पोटनिवडणूकीसह चार ठिकाणी काँग्रेस, 2 ठिकाणी शिवसेना (ठाकरे),1 भाजप तर दोन ठिकाणी स्थानिक पॅनलने सत्ता मिळविली आहे.

Back to top button