चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात औषधांचा तुटवडा | पुढारी

चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात औषधांचा तुटवडा

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : नांदेड येथील जिल्हा रूग्णालयात औषधाअभावी रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर हायकोर्टाने राज्यसरकारला फटकारले. त्यानंतर राज्यातील जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाल्याचे वास्तव समोर आले आहे. चंद्रपूरातील वैद्यकीय शासकिय महाविद्यालय आणि जिल्हा रूग्णालयात आज (दि. ५) रूग्णांच्या आरोग्य सेवेचे वास्तव्य तपासले असता धक्कादायक माहिती समोर आली. रूग्णांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागते. तर बहुतांश रूग्णांना एकाच प्रकारच्या एक किंवा दोन गोळ्या दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रूग्णांचे नातेवाईक ‘साहेब, एक किंवा दोनच गोळीमध्ये आजार कसा बरा होणार? असा प्रश्न जिल्हा रूग्णालय प्रशासानाला विचारू लागले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात 15 तालुक्यांचा समावेश आहे. सर्वात लांब ब्रम्हपूरी तर सर्वात जवळचा बल्लारपूर तालुका आहे. जिल्ह्यालगतच्या ठिकाणाला रेल्वेने मुल, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपरी, भद्रावती, वरोरा, बल्लारपूर जोडले आहे. अन्य ठिकाणी बस सुविधा आहे. जिल्हा सामान्य रूग्णालय आता शासकिय वैद्यकिय महाविद्यालय आणि जिल्हा रूग्णालयामध्ये रूपांतरीत झाले आहे. प्रशस्त असे रूग्णालय असल्याने जिल्हाभरातील गोरगरीब रूग्ण चंद्रपूरात येऊन उपचार करून जातात.
चंद्रपूरातील वैद्यकिय शासकिय महाविद्यालय आणि जिल्हा रूग्णालयात मागील पंधरा दिवसांपासून आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले आहेत. आजाराने ग्रस्त असलेले जिल्ह्यातील गोरगरीब रूग्ण मोठ्या आशेने चंद्रपूरात येऊन औषधोपचाराची आशा बाळगतात. परंतु ती आशाच निराश ठरत आहे. रूग्णांवर उपचार तर होत आहे, परंतु रूग्णालयात औषधांचा पत्ताच नसल्याने रूग्णांच्या डोळ्यात पाणी आहे. तपासणी झाल्यानंतर डॉक्टर औषधीची चिठ्ठी लिहून देतात. रूग्णांचे नातेवाईक औषणी घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना फक्त एक किंवा दोन टॅबलेट हातात टिकविल्या जात आहे. रूग्णालयात बहुतांश रूग्णांना एकाच प्रकारची टॅबलेट दिली जात असल्याचा रूग्ण नातेवाईकांचे म्हणने आहे. एक दोन टॅबलेट मध्ये आजार कसा बरा होणार या विंवंचनेत असताना रूग्ण नातेवाईकांना औषणी बाहेरून खरेदी करण्यासाठी सांगण्यात येत आहे.  सध्या रूग्णालयात उपचार वेळेवर होत नाही. झालेल्या उपचारावर रूग्णांना औषधी मिळत नाही, एक्सरेची सुविधा नाही. एक दोन टॅबलेटच्या व्यतीरिक्त अन्य औषधीचा पत्ता नाही.मोफतऔषधोपचार व्हावा करीता शासकिय रूग्णालयाकडे धाव घेणारे रूग्णांना बाहेरून खासगी  मेडीकल मधून औषधी खरेदी करावी लागत असल्याने आर्थीक भूर्दंड सहन करावाच लागतो शिवाय आरोग्य सेवेचा फटका बसला आहे.
जिल्हा रूग्णालयात रूग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. औषधौपचाराची नितांत गरज असताना  औषधांचा तुटवडा असल्याचे वास्त्व आज लपून राहिले नाही. चंद्रपूरात जिल्हा रूग्णालयात औषध तुटवड्याचा फटका रूग्णांना बसत आहे. आज गुरूवारी जिल्हा रूग्णालय परिसरात असलेल्या मेडीकल मध्ये मोठ्या रांगा औषधी खरेदी करण्यासाठी मोठ्या रांगा पहायला मिळाल्या. औषधी तुटवड्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात औषधाअभावी रूग्णांच्या झालेल्या मृत्यू नंतर चंद्रपूरातील आरोग्य व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा प्रशासन औषधांचा तुटवडा   नसल्याचे सांगत असले तरी येथे उपचार करण्यासाठी येणाऱ्या रूग्णांनी जिल्हा प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल केली आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने खबरदारी घेऊन  नांदेड मध्ये घडलेल्या घटनेची पूर्नरावृत्ती चंद्रपूरात होणार नाही, यांची काळजी घ्यावी अशी अपेक्षा रूग्ण व नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

Back to top button