चंद्रपूरातील ‘त्या’ हत्तीचा विद्युत शॉक लागून मृत्यू  | पुढारी

चंद्रपूरातील 'त्या' हत्तीचा विद्युत शॉक लागून मृत्यू 

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात आज (दि. ३) सकाळी चिटकी गावालगत शेतात मृत्तावस्थेत आढळून आलेल्या त्या हत्तीचा मृत्यू विद्युत शॉक लागून झाला. या बाबतचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. चिटकी गावातील दोघा बाप लेकाला संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आले. अशोक पांडुरंग बोरकर (वय 65), अजय अशोक बोरकर  (वय 29) रा. चिटकी असे संशयिताची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि. ३)  सकाळी सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत उपक्षेत्र तांबेगडी मेंढा येथील नियत क्षेत्र मुरपार बीटा मधील सिंदेवाही तालुक्यांत चिटकी गावालगत शेतात काही नागरीकांना जंगली हत्ती मृत्तावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती बीट वनरक्षक राठोड यांना देण्यात आली. सिंदेवाहीचे क्षेत्र सहाय्यक हे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्राचे विभागाचे अधिकारी आपल्या चमुसह चमू दाखल झाले. सदर घटनेची खात्री केल्यानंतर घटनास्थळावर मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा, सहायक वनसंरक्षक (प्रादे. व वन्यजीव), एम. बी. चोपडे, सहायक वनसंरक्षक हजारे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुधन विकास अधिकारी सुरपाम, डॉ. शालीनी लोंढे दाखल झाले. वरिष्ठांच्या उपस्थितीत संपूर्ण परिस्थितीची पाहणी केल्यानंतर हत्तीच्या मृत्तदेहाचे निरीक्षण करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हत्तीचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या आघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला. शेतमालक अशोक पांडुरंग बोरकर व सभोवतालच्या परिसराची झडती घेण्यात आली. या प्रकरणात वडिल अशोक पांडुरंग बोरकर व अजय अशोक बोरकर यांचे विरूध्द पी.ओ. आर. क्र. 09130/228231 अन्वये वन गुन्हा नोंदवून दोघे संशयीत बापलेकाला चौकशी करीता ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांचीही सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेचा संपूर्ण तपास ब्रम्हपुरीचे सहायक वनसंरक्षक एम. बी. चोपडे करीत आहेत.

Back to top button