राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांनी ११ सप्टेंबर पासून चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. ओबीसी मधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय सर्वे व्हावा व ओबीसी मुलामुलींचे वसतीगृह सुरू करून स्वाधार योजना लागू करावी, आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. आज शुक्रवारी आंदोलनाचा बारावा दिवस आहे. सत्ताधारी व प्रशासनाने आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही, त्यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी टोंगे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्याचा सल्ला वैद्यकिय विभागाने दिला होता. परंतु उपोषणस्थळीच उपचार करण्याची मागणी केल्याने रूग्णालयात भरती न करता उपोषणस्थळीच त्यांचेवर उपचार करण्यात आले. आज शुक्रवारी पुन्हा त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने वैद्यकीय विभागाने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत. त्यांना उपचारा करीता चंद्रपूर शासकिय मेडिकल कॉलेज मध्ये दाखल करण्यात आले.