

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ऑनलाईन रमी खेळाच्या आहारी जावून कर्जबाजारी झालेल्या एकाने पत्नीचा गळा दाबून खून केला. पत्नीचा खून करून घराशेजारील एका विहीरीत उडी घेऊन त्याने स्वत:ही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरात घडली. स्नेहा डहूले असे मृत पत्नीचे तर सुधाकर डहूले असे पतीचे नाव आहे. कौटुंबिक कारणातून घडलेल्या घटनेत पती पत्नीचा जीव गेल्याने देवाडा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Chandrapur Crime)
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मृत सुधाकर हा रमी खेळाच्या आहारी जावून कर्जबाजारी झाला होता. त्याने या खेळाकरीता सुमारे वीस लाख रूपये कर्ज केले होते. मोठ्या भावाने त्यापैकी बराच कर्जाचा वाटा चुकता केला होता. वारंवार त्याला अशा खेळापासून थांबविण्याचा प्रयत्न पत्नीने केला होता. परंतु ऑनलाईन खेळाच्या आहारी गेलेला सुधाकर पत्नीचेही ऐकत नव्हता, त्यामुळेच त्यांच्यात भांडण होत होते. सुधाकर इलेक्ट्रिशियन व्यवसायातून मिळणारा सर्व पैसा रमी खेळात ऑनलाईनद्वारे खर्च करीत होता. (Chandrapur Crime)
डहुले कूटूंब हे मुळचे घुग्घूसचे होते. परंतु पडोली पोलीस स्टेशन हद्दीतील देवाडा गावात ते बऱ्याच वर्षांपासून महाकाली परिसरातील भागात राहत होते. या ठिकाणी इलेक्ट्रिशीयनचे सुधाकर हा काम करीत होता. त्यातून मिळणाऱ्या कमाईवर कुटूंबाचा उदरनिर्वाह चालत होता. आज सोमवारी (8 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास कौटुंबिक वादातून पती पत्नीमध्ये भांडण झाले. कडाक्याचे भांडण विकोपाला गेल्याने पती सुधाकर याने प्रथम पत्नी स्नेहा हिचा गळा आवळून खून केला. पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याने त्यानेही स्वत: जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुधाकर डहूले याने आपल्या मोठ्या भावाला पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. तसेच आपणही आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्यांनतर महाकाली परिसरातील स्व:तच्या घराजवळील गजानन महाराज मंदिर परिसरातील एका खोल विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मोठ्या भावाने पडोली पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्वप्रथम पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनाकरीता पाठविला. त्यांनतर त्याने आत्महत्या केलेल्या विहिरीचा शोध घेण्यात आला. गजानन महाराज मंदिर परिसरात विहीर आहे. त्या ठिकाणी शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह आढळून आला.
जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन टीमला पाचारण करून मृतदेह विहरीतून काढण्यात आला. मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आला. सदर घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आली. त्यांनी लगेच घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
हेही वाचा