

बुलडाणा: बुलढाणा ते खामगांव दरम्यान अगदी महामार्गालगत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात वनविभागाच्या वतीने आज रविवारच्या पहाटे २ वाजेच्या सुमारास PKT7CP-1 नावाच्या नर जातीच्या तीन वर्षीय वाघाला सोडण्यात आल्यामुळे 'ज्ञानगंगा'च्या वनवैभवात भर पडली आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पापासून वाहनातून सलग १५ तासांचा प्रवास करून हा वाघ शनिवारी रात्री ज्ञानगंगा अभयारण्यात आणण्यात आला. २०२३मध्ये पांढरकवडा (जि.यवतमाळ) वनक्षेत्रात अंदाजे चार महिने वयाचे वाघाचे शावक आढळले होते नंतर त्याचे पेंच व्याघ्र प्रकल्पात संगोपन करून त्याचे या वाघाचे नांव - PKT7CP-1 असे ठेवले आहे.
या वाघाला तूर्त ज्ञानगंगा अभयारण्यातील बोरखेड -देव्हारी परिसरात बंदीस्त जाळीच्या विस्तारित क्षेत्रात सोडण्यात आले आहे. त्याच्यासाठी भक्ष्य म्हणून परिसरात सोडलेल्या एका रेड्याची त्याने चार तासातच शिकारही केली. त्यामुळे येथील वातावरणाशी हा वाघ लवकरच जुळवून घेईल असा विश्वास वनाधिका-यांनी व्यक्त केला.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत असलेल्या २०५ चौ.कि.मी.क्षेत्राच्या या ज्ञानगंगा अभयारण्यात साग व अंजन या वृक्षांची हिरवाई,नयनरम्य डोंगर,बिबट,अस्वल,तडस,नीलगायी,हरणे,कोल्हे आदी वन्य प्राण्यांसह १५० प्रजातीच्या पक्षांनी समृध्द असलेल्या वनसंपदेत PKT7CP-१ या वाघाची भर पडल्याने अभयारण्याचे संरक्षण होण्यास अधिकच मदत होणार आहे. बुलडाणा - खामगांव हा महामार्ग या अभयारण्यातून जातो त्यामुळे प्रवाशांना वाहनातून कधीतरी व्याघ्र दर्शनाची संधी मिळू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.