

बुलढाणा : रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नवनियुक्त बुलढाणा जिल्हा अध्यक्ष व जवळचे सहकारी ज्ञानेश्वर प्रकाश टाले (रा.डोणगांव ता.मेहकर) यांना त्यांच्या नियुक्तीच्या दुस-याच दिवशी (दि.४) तडीपारीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
३ मार्च रोजी पुणे येथील कार्यक्रमात तुपकर यांनी संघटनेची कार्यकारिणी जाहीर केली. त्यात ज्ञानेश्वर टाले यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर दुस-याच दिवशी मेहकरचे उपविभागीय दंडाधिकारी रविंद्र जोगी यांनी एका आदेशाद्वारे टाले यांना बुलढाण्यासह शेजारच्या सहा जिल्ह्यांतून एक वर्ष कालावधीसाठी तडीपार केले आहे. या कारवाईमुळे तुपकर यांच्या शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. ज्ञानेश्वर टाले हे तुपकर यांचे जवळचे व जुने सहकारी आहेत.
टाले यांची वर्तणूक चांगली नाही, त्यांच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने आगामी काळातील सण-उत्सव व निवडणूका पाहता कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पाहून तडीपारीची कारवाई करत असल्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी रविंद्र जोगी यांनी पारित केला आहे.
ज्ञानेश्वर टाले यांच्यावरील तडीपारीची कारवाई ही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या राजकीय दबावाखाली झाली असल्याचा जाहीर आरोप रविकांत तुपकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. लोकसभा निवडणूक त्यांच्या विरोधात लढवल्याने मंत्री जाधव यांनी प्रशासनाकडून आकसाने ही कारवाई करवून घेतली असे तुपकर यांनी म्हटले आहे .