

बुलढाणा : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. महामार्गावर 'हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' अंतर्गत अत्याधुनिक 'गॅन्ट्री' उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी ७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील किमी १७८.९०० ते २९०.४०० या १११ किलोमीटरच्या अंतरात हे काम चालणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील तालुक्यांचा समावेश आहे.
वाशिम जिल्हा : कारंजा (लाड), मंगरुळपीर, मालेगाव.
बुलढाणा जिल्हा : मेहकर.
गॅन्ट्री उभारणीच्या कामासाठी एकूण ३५ टप्प्यांत वाहतूक रोखली जाईल. प्रत्येक टप्प्यात संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णपणे बंद असेल. काम पूर्ण होताच वाहतूक पुन्हा पूर्ववत केली जाईल.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड), मंगरुळपीर, या मालेगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या चार तालुक्यांतून जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर ही 'गॅन्ट्री' उभारली जाणार आहे. या कामासाठी संबंधित वाहिनीवरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असून, काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक तत्काळ सुरू करण्यात येणार आहे.
समृध्दी महामार्गावरून मुंबई व नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुक ही ठराविक वेळेत बाधित होणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा व प्रवासाचे नियोजन करूनच मार्गक्रमण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
७ ते २३ फेब्रुवारी दरम्यान मुंबई आणि नागपूर या दोन्ही वाहिन्यांवर विविध ठिकाणी हे ब्लॉक्स घेतले जातील.
वेळ : प्रामुख्याने रात्री १२ ते १ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत.
ठिकाणे : किमी १७८.९०० पासून २८३.९०० पर्यंतच्या विविध १९ निश्चित पॉइंट्सवर हे काम चालणार आहे.
मुंबई किंवा नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी या ठराविक वेळेत प्रवास टाळावा किंवा प्रवासाचे योग्य नियोजन करावे. वाहतूक बाधित होणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, प्रवासादरम्यान महामार्ग पोलीस आणि रस्ते विकास महामंडळाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, जेणेकरून सुरक्षितता राखली जाईल.
दि. ७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत विविध तारखांना रात्री १२ ते १ वाजेपर्यंत तसेच दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत, मुंबई व नागपूर वाहिनीवर अनुक्रमे कि.मी. १७८.९०० , १७९.७५०, १८३.७०० , १८५.५००, १९०.४०० , २००.४००, २०५.४०० , २०८.२००, २०८.८५० , २३८.५५०, २४२.६०० , २४५.४००, २५०.५००, २६०.४००, २६४.८०० , २७०.४००, २८०.४०० , २८१.४०० व २८३.९०० या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.