

Residents of Lonar distressed by petrol and diesel shortages
लोणार, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ग्रामीण भागात काही नागरिकांकडून गरजेपेक्षा अधिक प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल कॅन तसेच मोठ्या प्लास्टिक टाक्यांमध्ये साठवून ठेवले जात असल्याने शहरातील पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण होत असल्याची चर्चा आहे. परिणामी अत्यावश्यक कामांसाठी इंधन घेण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल व डिझेल मिखौँ नसल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल आणि पेट्रोल मिळविण्यासाठी सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. विशेषतः शेतकरी, ट्रॅक्टर चालक, मालवाहतूक करणारे वाहनधारक आणि दुचाकीस्वारांना इंधनासाठी तासान्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी तर "डिझेल उपलब्ध नाही" असे फलक झळकतांना दिसत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण भागातील काही लोक भविष्यात इंधन टंचाई निर्माण होण्याच्या भीतीने मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल कॅनमध्ये भरून नेत आहेत. अनेक घरांमध्ये ३० ते ४० लिटर क्षमतेच्या सिंटेक्स टाक्यांमध्ये डिझेल साठवून ठेवले जात असल्याची चर्चा आहे.
प्रशासनाने ग्रामीण भागात जाऊन तपासणी केल्यास अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात इंधन साठवलेले आढळून येईल, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. याशिवाय काही जणांनी अतिरिक्त इंधनाचा साठा करून त्याची जादा दराने काळ्या बाजारात विक्री सुरू केल्याचाही आरोप होत आहे. अधिकृत दरापेक्षा जास्त पैसे घेऊन पेट्रोल-डिझेलची विक्री केली जात असल्याने सामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार वाढत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, पेट्रोल पंप चालकांनीही वाढत्या मागणीमुळे इंधनाचा पुरवठा कमी पडत असल्याचे सांगितले. काही ग्राहक एकाचवेळी मोठ्या प्रमाणात डिझेल आणि पेट्रोल कॅनमध्ये भरून नेत असल्याने रोजच्या गरजेपुरते इंधन घेणाऱ्या वाहनधारकांना पुरेसा साठा उपलब्ध होत नाही. यामुळे शहरातील पंपांवरील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे.
शेतकरी वर्गालाही याचा मोठा फटका बसत आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी ट्रॅक्टर, पंप आणि शेती अवजारांसाठी डिझेलची मोठी गरज असताना वेळेवर इंधन मिळत नसल्याने शेतीची कामे खोळंबण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी केली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे ग्रामीण भागातील अवैध इंधन साठ्याची तपासणी करण्याची तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पेट्रोल कॅनमध्ये देण्यावर बंधन
पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये इंधन देण्यावर नियंत्रण आणून प्रत्येक ग्राहकाला मर्यादित प्रमाणात इंधन देण्याचा नियम लागू करावा, अशीही मागणी पुढे येत आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत तर आगामी काळात इंधन टंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.