Prathamesh Javakar: आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या बुलढाण्याच्या प्रथमेश जावकरवर कौतुकाचा वर्षाव

Prathamesh Javakar: आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या बुलढाण्याच्या प्रथमेश जावकरवर कौतुकाचा वर्षाव

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: चीन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकाविणाऱ्या बुलडाणा येथील प्रथमेश जावरकर याचे जिल्हा प्रशासनाने कौतुक केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दूरध्वनीद्वारे चीन येथे असलेल्या प्रथमेश जावरकरचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Prathamesh Javakar)

19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा चीन येथील हांगझोऊ येथे पार पडली. या स्पर्धेत कंपाऊंड राऊंडमध्ये सांघिक प्रकारातील सुवर्ण पदक मिळविणाऱ्या अलमपूर, ता. नांदुरा (जि.बुलढाणा) येथील प्रथमेश समाधान जवकार याने ऐतिहासिक कामगिरी करुन जिल्ह्याचे नाव क्रीडा क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी नोंदविले आहे. कठोर मेहनतीने प्रथमेशने ग्रामीण भागातील प्रतिभा दाखविली आहे. प्रथमेश जवकार हा खेळाडू बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत बुलढाणा तालुका क्रीडा संकुल समितीचा खेळाडू असून आर्चरीचा नियमित सराव करीत आहे. (Prathamesh Javakar)

सन 2023 मधील हे त्याचे तिसरे आंतरराष्ट्रीय सुवर्ण आहे. यासोबत एक रौप्य, एक कास्य पदकाची कमाई त्याने केली आहे. सदर स्पर्धेसाठी त्याच्यासह दिल्लीचा अभिषेक वर्मा, नागपूरचा ओजस देवतडे यांच्या संघाने अंतिम सामन्यात दक्षिण कोरिया सारख्या बलाढ्य संघाला एकतर्फी मात दिली. प्रथमेशने लहानपनापासूनच ऑलिंपिक पदक ध्येय ठेऊन कारकिर्दीस सुरुवात केली आहे. जागतिक क्रमवारीत त्याने पहिल्या क्रमांकाचे ध्येय बाळगले आहे. त्यादृष्टीने सलग दोनवेळा पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूचा पराभव करीत स्वत:मधील गुणवत्तेची चुणूक दाखविली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसारख्या मानाच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवित त्याने बुलढाणाचे नाव संपूर्ण जगामध्ये कोरले आहे.

जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री दिलीप वळसे- पाटील, उपाध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, बुलढाणा तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांनी प्रथमेश जवकारचे कौतुक केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news