

बुलढाणा : सार्वजनिक आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील एकूण पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड झाली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तीन तर धाराशिव जिल्ह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.
मानांकन प्राप्त प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला दरवर्षी प्रत्येकी तीन लाख रुपये याप्रमाणे सलग तीन वर्षे आर्थिक बक्षीस देण्यात येणार आहे. या निधीचा उपयोग रुग्णांसाठी आवश्यक सुविधा वाढविणे तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या तातडीच्या उपचार सेवा, रुग्ण रेफरलचे प्रमाण, प्रसूती सेवा, रुग्णांसाठी असलेल्या आरोग्य सुविधा, परिसराची स्वच्छता, उद्यान व्यवस्था, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा वापर तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती आदी बाबी केंद्रस्थानी ठेवून सखोल तपासणी करण्यात आली. ७ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत केंद्रीय परीक्षकांनी मुद्देनिहाय पाहणी करून अहवाल केंद्रीय समितीकडे सादर केला होता.
या मानांकनात बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र किन्होळा, खामगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गणेशपुर आणि मेहकर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जानेफळ यांचा समावेश आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील दहिपाल व अनाळा ही दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे मानांकनासाठी पात्र ठरली आहेत.
या यशासाठी चिखली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ऋषिकेश कणखर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुराधा गारोडे व किन्होळा प्राथमिक आरोग्य केंद्राचा चमू, खामगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एस. तेलंग व गणेशपुर केंद्राचा चमू, तसेच मेहकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय बलकार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज ठाकरे व जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमूने विशेष परिश्रम घेतले.
या राष्ट्रीय मानांकनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेत अधिक भर पडणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.