

Padmkar Valvi Join Congress
बुलढाणा : नंदुरबार जिल्ह्याचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी अखेर काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत बुलढाणा येथे वळवी यांनी औपचारिक पक्षप्रवेश केला. यावेळी जिल्ह्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पद्माकर वळवी यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत दिले होते. मात्र, ऐन वेळेस त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकीय वर्तुळाला धक्का दिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी वळवी यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा रंगली होती. परंतु अखेर त्यांनी पुन्हा काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.
वळवी यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला फायदा होणार असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेसमध्ये त्यांचे स्वागत कसे केले जाणार आणि त्यांना कोणती जबाबदारी दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.