

बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा : वाशिम जिल्ह्यातील रुई येथील रहिवासी व पुण्यातील खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या राहुल शेषराव चव्हाण याने पत्नीशी पैशावरून झालेल्या वादानंतर पोटच्या प्रणाली व प्रतीक्षा (3 वर्ष) चिमुकल्या जुळ्या मुलींना पुणे येथून बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा फाटा परिसरात असलेल्या अंचरवाडी जंगलात आणून त्यांचे गळे चिरून निर्घृण हत्या केली. ही घटना 21 ऑक्टोबर रोजी घडली. दरम्यान, शनिवारी (दि. 25) राहुल याने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन खून केल्याची कबुली दिली.
राहुल चव्हाण याचे त्याच्या पत्नीशी पुणे येथे पैशावरून भांडण झाले. यावेळी पत्नीने संतापून पती राहुल यास ‘आता मुले तूच सांभाळ’, असे सांगितले. त्यानंतर राहुलने दोन्ही जुळ्या मुलींना सोबत घेऊन तो घराबाहेर पडला. राहुलचा मोबाईल स्वीच ऑफ असल्याने घरच्यांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्याची तयारी सुरू केली. दरम्यान, तीन दिवसांनंतर राहुल अचानक शेतात काम करणार्या त्याच्या भावास दिसला.त्याने त्याला तीन दिवस कोठे होता या बाबत विचारणा करीत दोन्ही मुलींची चौकशी केली. यावेळी राहुल याने आपण मुलींचा खून केल्याचे सांगितले.