

बुलढाणा: बुलढाणा तालुक्यातील पळसखेड भट येथील शेतशिवारात आग्यामोहोळाच्या मधमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार, दि. ३१ मार्च रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर सोबत असलेल्या शेतमजुराने प्रसंगावधान राखत विहिरीत उडी घेतल्याने त्याचे प्राण वाचले.
प्राप्त माहितीनुसार, पळसखेड भट येथील रहिवासी शेतकरी सोहम ज्ञानदेव सुरोशे (वय ६५) हे शेतमजूर सचिन निकाळजे (वय ३०) यांच्यासह शेतात उन्हाळी मशागतीची कामे करत होते. यावेळी अचानक आग्यामोहोळाच्या हजारो मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढवला व त्यांचा पाठलाग केला.
दंशापासून बचाव करण्यासाठी दोघेही सैरावैरा पळू लागले. यावेळी सचिन निकाळजे यांनी प्रसंगावधान राखत जवळील विहिरीत उडी घेतली. मधमाशांनी विहिरीपर्यंत त्यांचा पाठलाग केला व पाण्याच्या पृष्ठभागावरही घोंघावत राहिल्या. सचिन यांनी जवळपास दीड ते दोन तास पाण्यात राहून, अधूनमधून श्वास घेण्यासाठी डोके वर काढत जीव मुठीत धरला.
मधमाशांचा धोका कमी झाल्यानंतर ते विहिरीबाहेर पडले व गावात जाऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थ व कुटुंबीयांनी शेतात धाव घेतली असता, नदीजवळील झाडाझुडपांमध्ये सोहम सुरोशे हे मधमाशांच्या तीव्र दंशामुळे निपचित अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे पळसखेड भट परिसरात शोककळा पसरली आहे.