

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा
समृध्दी महामार्गावर रात्रीच्या वेळी थांबलेल्या वाहनांतून डिझेलची चोरी करणारी चार चोरट्यांची टोळी बिबी पोलीसांनी जेरबंद केली आहे. आज (शुक्रवार) पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास समृध्दी महामार्गाच्या चेनेज क्र.३१० जवळ मांडवा शिवारातील पेट्रोल पंपासमोर लासलगाव ता.निफाड येथील ट्रकचालकाने विश्रांतीसाठी सर्विस लेनवर ट्रक (क्र.एमएच१५-इ जी ९५१३) उभा केलेला होता. दरम्यान या ट्रकच्या डिझेल टाकीचे झाकण उघडल्याचा आवाज आल्यामुळे ट्रकचालक प्रदिपसिंग मान याने खाली उतरून पाहिले असता दोन चोरटे ट्रकच्या टाकीतून नळीद्वारे डिझेल काढत असल्याचे दिसून आले.
ट्रकचालकाने त्यांना हटकताच चोरटे त्यांच्याकडील इर्टिगा कारमध्ये बसून भरधाव वेगाने पळून जात असतांना त्यांची कार महामार्गाच्या बैरिअरला धडकून अपघात झाला. त्याचवेळी पोलीसांचे गस्ती वाहन तेथून जात असताना त्यांना अपघातग्रस्त कार दिसली. पोलीसांनी जखमी झालेल्या चालकाला कारमधून बाहेर काढले. यावेळी कारमध्ये प्लास्टिकच्या मोठ्या आकाराच्या आठ कॅन आढळल्याने डिझेल चोरीचा संशय आला. त्यावेळी पोलीसांनी कारचालकाची कसून चौकशी केली असता, त्याने अन्य तीघे व आपण महामार्गावर ट्रकमधील डिझेल चोरण्यासाठी आलो होतो ते तीघे साथीदार पळून गेल्याचे कारचालक ज्ञानेश्वर फकिरबा सोसरे याने सांगितले.
पोलीसांनी या जखमी कारचालकाला उपचारासाठी बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनी तातडीने तपास करून पळून गेलेल्या त्या तीनही चोरट्यांना तीन ठिकांणाहून ताब्यात घेतले. आरोपी शुभम दिपक उबरहंडे (वय२५,रा.चिखली), हर्षद पांडूरंग साबळे (वय २३,रा.डौलखेड ता. जाफ्राबाद) संकेत सुनिल बोर्डे (रा.शेलगाव आटोळ ता.चिखली) व कारचालक ज्ञानेश्वर फकिरबा सोसरे या चार चोरट्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांच्या ताब्यातून ५० लिटर डिझेलसह अकरा कैन , रबरी नळी व चोरीसाठी वापरलेली इर्टिगा कार (क्र.एम एच २८- व्ही ९३१०) किंमत सात लाख रू. असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व बिबी पोलीसांच्या पथकाने ही कारवाई केली.