

Buldhana Police Corruption News
बुलढाणा: कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा सामान्य नागरिकाने कुणाकडे दाद मागावी? असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. कर्नाटक राज्यातील एका चित्रपट निर्मात्याची कार अडवून, त्याचा पाठलाग करून आणि अपघात झाल्यानंतर दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या गंभीर आरोपाखाली पाच वाहतूक पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असून, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तात्काळ पाचही जणांना सेवेतून निलंबित केले आहे.
हे धक्कादायक प्रकरण ५ ऑगस्ट रोजी घडले. कर्नाटक राज्यातील चल्लेकरे, जिल्हा चित्रदुर्गा येथील शॉर्टफिल्म निर्माते ताज अब्दुल रहेमान रहेमतुल्लाह (वय २३) हे आपल्या सहकाऱ्यांसोबत कारने मलकापूरकडे जात होते. त्यावेळी चिखली-बुलढाणा बायपास चौफुलीवर दोन वाहतूक पोलिसांनी त्यांची कर्नाटक पासिंगची कार अडवली. कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून १,५०० रुपयांची मागणी करण्यात आली आणि जवळच्या चहा टपरी चालकाच्या पेटीएमवर ही रक्कम स्वीकारण्यात आली. काही अंतर पुढे गेल्यानंतर, अन्य तीन वाहतूक पोलिसांनी त्यांच्या गाडीने या कारचा पाठलाग सुरू केला. या थरारक पाठलागामुळे घाबरलेल्या ताज अब्दुल रहेमान यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघातानंतर मदत करण्याऐवजी, त्या तीन पोलिसांनी ताज यांना धमकावण्यास सुरुवात केली. "तुमच्या कारमध्ये एअरगन आहे, कारवाई टाळायची असेल तर दोन लाख रुपये द्या," अशी मागणी करत त्यांनी खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला.
या संपूर्ण छळाने त्रस्त झालेल्या ताज अब्दुल रहेमान यांनी थेट चिखली पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार कथन करत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. तपासात तक्रारीत तथ्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, चिखली पोलिसांनी पाचही वाहतूक पोलिसांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. गजानन भंडारी, अभय टेकाळे, विठ्ठल काळूसे, संदीप किरके आणि विजय आंधळे अशी आरोपींची नावे आहेत.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आणि पोलीस दलाच्या प्रतिमेला लागलेला डाग पुसण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली. गुन्हा दाखल होताच त्यांनी पाचही पोलिसांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्याचा आदेश दिला. एकाच वेळी पाच पोलिसांवर झालेल्या या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. महामार्गांवर होणाऱ्या वसुलीच्या आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या त्रासाच्या तक्रारी अनेकदा समोर येतात, मात्र या प्रकरणाने त्याचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. पोलीस अधीक्षक तांबे यांच्या कठोर भूमिकेचे स्वागत होत असले तरी, या घटनेमुळे पोलीस दलातील गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे.