

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : चिखली येथील तालुका क्रीडा संकुलातील जलतरण तलावात पोहताना बुडाल्याने आयुर्वेदिक महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.आज गुरूवार दि.१०च्या सायंकाळी ६.३०च्या सुमारास ही दुःखद घटना घडली आहे. विवेक अरूण वारले (३२,रा.पाथर्डी ता.तेल्हारा जि अकोला) व सूरज सुनिल पानखडे(२१,रा.गेवराई जि.बीड) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
सद्या उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असल्याने चिखली येथील डॉ . हेडगेवार आयुर्वेद रूग्णालयात बीएएमएस चे शिक्षण घेत असलेले सहा विद्यार्थी तालुका क्रिडा संकूलातील जलतरण तलावावर सायंकाळी पोहायला गेले होते. तेथे ही आकस्मिक दुर्दैवी घडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. क्रिडा विभागाने कंत्राटी तत्वावर खासगी व्यक्तीला हा जलतरण तलाव चालवायला दिलेला आहे. आपत्कालिन स्थितीत आवश्यक असलेली कोणतीही जीवनरक्षक व्यवस्था तेथे नसल्याचे समोर आले आहे. डॉक्टर होण्याची स्वप्ने पाहिलेल्या दोन विद्यार्थ्यांचा असा आकस्मिक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.