

बुलढाणा : खामगाव-शेगाव राज्य मार्गावर आज बुधवारी ( दि २) पहाटे ५.३० वाजता जयपूर लांडे फाट्यावर कार, एस.टी.बस आणि खासगी ट्रॅव्हल्स या तीन वाहनांची जबर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच प्रवासी घटनास्थळीच ठार झाले. यात कारमधील ४ आणि ट्रॅव्हल्समधील एका महिला प्रवाशाच्या समावेश आहे. या अपघातात सात प्रवासी गंभीर जखमी तर २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने खामगाव व अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बोलेरो कार ही शेगावहून खामगावच्या दिशेने जात असतानाच समोरून येणाऱ्या एसटीला समोरून धडकली. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेली परतवाडाकडे चाललेली इंदाणी ट्रॅव्हल्सच्या खासगी बसने एस.टी.बसला धडक दिली. या तिहेरी अपघातात बोलेरो कारमधील शिवाजी समाधान मुंडे (४२ रा.शेगाव), शिवपाल (३२रा.मध्यप्रदेश) ,धनेश्वर भरावी (३० रा. मध्यप्रदेश) कृष्णकुमार मोहनसिंह होते (२० रा.मध्यप्रदेश) हे चार प्रवासी व ट्रॅवल्स बसमधील मेहरून्निसा शेख हबीब (४५ रा.धुळे) ही महिला प्रवासी असे पाच जण जागीच ठार झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान रणजीत वानखेडे (४०रा.मुर्तीजापूर) यांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या सहा झाली आहे. या अपघातात तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी अपघातस्थळी भेट दिली.