

बुलढाणा : जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा आज मंगळवार दि.२२ रोजी दुपारी ३.३० वाजता मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजिलेल्या 'प्रवेश सोहळ्या'वर आता पाणी फेरले आहे. मुख्यमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता.
काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी सोमवारच्या रात्री राहूल बोंद्रे यांना फोन केला. "कोणत्याही दबावाखाली घाई करू नका, पक्षांतरांचे पाऊल उचलू नका" असा सल्ला दिला. या संवादाने भावूक झालेल्या बोंद्रे यांनी राहूल गांधीं यांना "आपण सर्वस्व गमावू पण काँग्रेस सोबतच राहू!" अशी ग्वाही दिली.
त्या दोघांतील संवादाची व्हिडीओ क्लीप राहूल बोंद्रे यांच्या कार्यालयातून रात्रीच व्हायरल झाल्यामुळे बोंद्रे यांनी पक्षांतराचा निर्णय फिरवल्याचे त्याचवेळी स्पष्ट झाले. काँग्रेस नेते राहूल बोंद्रे यांच्या भाजपा प्रवेश सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांची १५० वाहने तयार होती. मुंबईकडे निघण्याची पूर्ण तयारीही झालेली होती.
दरम्यान, राहूल गांधी यांचा राहूल बोंद्रे यांना फोन आला आणि क्षणभरातच पक्षांतराबाबतचा माहौल अकस्मात बदलला. बोंद्रे यांनी मंगळवारी पहाटे सोशल मिडियावर एक पोस्ट टाकली. "राहूल गांधी यांच्या लढ्यात सर्वस्व अर्पण करण्याची तयारी" यातून त्यांनी आपली पुढची राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. राहूल गांधी यांना भेटण्यासाठी बोंद्रे हे रात्रीच दिल्लीकडे रवाना झाले.
अनामिक दबाव?
राहूल बोंद्रे हे १२ वर्षे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व सलग १० वर्षे चिखली मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार होते. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार श्वेताताई महाले यांच्याकडून ३२०१ मतांनी ते पराभूत झाले आहेत. चिखली मतदारसंघाच्या राजकारणात दबदबा असलेले राहूल बोंद्रे यांच्या ताब्यात नागरी सहकारी बॅंक, अभियांत्रिकी व फार्मसी कॉलेजेस व अन्य संस्था आहेत. यापैकी काही संस्थांतील कथित अनियमिततांच्या चौकशा मागे लागल्यांमुळे बोंद्रे यांची गेल्या वर्षांपासून अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात होते. मागील महिन्यात एका संस्थेच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवला आहे.
दरम्यान, आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राहूल बोंद्रे यांनी रविवारी सोशल मीडियावरून जाहीर करून काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्का दिला होता. त्यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्याची मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये सर्व तयारीही झाली होती. पण सोमवारच्या रात्री राहूल गांधी यांच्या फोननंतर बोंद्रे यांनी घेतलेल्या 'यु टर्न'मुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण विविध चर्चांनी ढवळून निघाले आहे.