

बुलढाणा : स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी किती यातना सहन कराव्या लागतात, याचे एक अत्यंत विदारक आणि काळीज पिळवटून टाकणारे वास्तव बुलढाणा जिल्ह्यातून समोर आले आहे. जळगाव जामोद तालुक्यातील चाळीसटपरी येथील एका २० वर्षीय गर्भवती महिलेला साप चावल्याची घटना घडली. रस्त्याअभावी तिला झोळी करून रुग्णालयात न्यावे लागले. मात्र वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा वाटेतच पोटातील बाळासह दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसटपरी येथील सादुरी राधेशाम खरात (वय २०) या गर्भवती महिलेला २५ ऑगस्ट रोजी साप चावल्याने तिची प्रकृती बिघडू लागली. गावातून बाहेर जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नातेवाईकांनी बांबूला चादर बांधून झोळी तयार केली. रुग्णाला खांद्यावर घेऊन त्यांनी खडतर वाट तुडवत आधी भिंगारा गाव आणि तेथून जळगाव जामोदचे शासकीय रुग्णालय गाठले. मात्र, तेथे संर्पदंशावर आवश्यक उपचारांची सुविधा नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सादुरीला तातडीने खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे तिची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्याचा सल्ला दिला.
यादरम्यान सादुरी आणि तिच्या नातेवाईकांची उपचारासाठी मोठी फरफट झाली. अखेर अकोल्याकडे जात असताना वाटेतच तिची मृत्यूशी झुंज संपली. वेळेवर रस्ता आणि प्राथमिक आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे एका निष्पाप गर्भवतीचा आणि तिच्या पोटातील बाळाचा नाहक बळी गेला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त होत आहे. विकसित भारताचे दावे केले जात असताना, दुर्गम भागातील हे भीषण वास्तव प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे.