

बुलढाणा: अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने जिल्ह्यात दोन ठिकाणी अवैध बायोडिझेल विक्री व वापराचा पर्दाफाश केला. यात मेहकर तालुक्यातील मोकळ्या जागेत तसेच सिंदखेडराजा येथील हॉटेल 'गावकरी फॅमिली रेस्टॉरंट'समोर सुरू असलेल्या अवैध बायोडिझेल पंपावर धडक कारवाई करण्यात आली.
राज्य दक्षता पथक, मुंबई यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, या कारवाईत सुमारे २१ लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये एका ट्रकसह बायोडिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला.तसेच एक ट्रक,भूमिगत लोखंडी टाकी, डिस्पेन्सर युनिट,बायोडिझेल साठा,पाइप व इतर साहित्यही ताब्यात घेण्यात आले.
नियंत्रक शिधावाटप व राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळावर अवैधरीत्या बायोडिझेलची विक्री व साठवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.
जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा
जप्त करण्यात आलेला बायोडिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थ नेमका कोठून आणण्यात आला, याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.स्थानिक पोलीस व पुरवठा विभागाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
या कारवाईत राज्य दक्षता पथकातील शिधावाटप उपनियंत्रक गणेश बेल्लाळे, सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रूपेश विजय बिजनावर, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरे यांच्यासह शिधावाटप निरीक्षक व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.