

बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे मोताळा तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास चार अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कोल्हे यांचेवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारच्या सायंकाळी सहाच्या सुमारास तालखेड फाट्यादरम्यान हा हल्ला झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. दोन बाईकवरून आलेल्या व तोंडावर रुमाल बांधलेल्या चार हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुनिल कोल्हे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा डावा पाय व डावा हात फ्रॅक्चर झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याच्या घटनेकडे पाहिले जात आहे.
दरम्यान, निवडणूकीत निसटता पराभव झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड. जयश्रीताई शेळके यांनी रुग्णालयात जाऊन, जखमी झालेल्या सुनिल शेळके यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी शेळके यांनी केली आहे.
"महाविकास आघाडीचे निष्ठेने काम करणाऱ्या लोकांवर प्राणघातक हल्ले केले जात असून निवडणूकीचा निकाल लागल्यापासून कार्यकर्त्यांच्या घरावर तलवारी घेऊन चाल करणे, ज्यांच्या घरावर प्रचाराचे बॅनर होते त्यांना मारहाण करणे तसेच धमकावण्याचे प्रकार सुरु असल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी शेळके यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुनिल कोल्हे यांच्यावरील हल्ल्याची वार्ता कळल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे धाव घेतली आहे.