

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतूकीस प्रतिबंध करणा-या राजस्व मंडल अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर व जेसीबी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या दोन्ही वाहनांचे चालक व त्यांचा सहायक अशा तीन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रत्येकी दहा वर्षे सश्रम कारावासाची व प्रत्येकी १५०० रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे. सतीश जाधव (रा.कोलवड), प्रमोद उबरहंडे, अमोल उबरहंडे (रा. भादोलावाडी) अशी शिक्षा झालेल्या तीघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाच वर्षांपूर्वी ९मार्च २०१७ रोजी बुलढाणा शहराजवळ अजिंठा मार्गावर ट्रॅक्टरद्वारे गौण खनिज मुरूमाचे अवैध उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुलढाणा नायब तहसिलदार शाम भांबळे व राजस्व मंडल अधिकारी शैलेश गिरी हे पोलीस कर्मचाऱ्यांसह मुरुमाच्या उत्खननस्थळी पोहचले. त्यांनी संबंधित ट्रैक्टर व जेसीबी ही दोन्ही वाहने पोलीस स्टेशनकडे घेण्याचे बजावले असता दोन्ही चालकांनी नकार देऊन वाहनांसह तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने ती अडवली असता ट्रैक्टर चालक सतिश चिंतामण जाधव (रा. कोलवड) याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्र.एमएच २८-टी ९२८६) हा मंडल अधिकारी शैलेश गिरी यांच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी जेसीबी चालक प्रमोद उबरहंडे व त्याचा सहायक अमोल उबरहंडे (रा. भादोलावाडी) या दोघांनी त्यांच्या ताब्यातील जेसीबी (क्र.एमएच२८-टी९१९९) हा पोलीस नाईक महादेव इंगळे यांच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
यावेळी सुदैवाने गिरी व इंगळे यांनी प्रसंगावधान दाखवल्याने त्यांची जीवितहानी टळली होती. या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीनही आरोपींना अटक केली होती व तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.या प्रकरणी एकूण ११जणांच्या साक्षी नोंदवल्या गेल्या. सरकारी वकील सोनाली सावजी देशपांडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.गौणखनिजाच्या अवैध उत्खननास प्रतिबंध केल्याने मंडल अधिकारी व पोलीस कर्मचा-यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र मेहरे यांनी ट्रॅक्टर-जेसीबी चालक आणि सहायक अशा तिघांना प्रत्येकी दहा वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १५०० रू दंड अशी शिक्षा सुनावली आहे.