Buldhana News | मेहकर ग्रामीण रूग्णालयाजवळ महिलेची रस्त्यावरच प्रसूती, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या 'होमटाऊन'मधील संतापजनक घटना

रुग्णालयाबाहेर येण्यास कर्तव्यावरील परिचारिकेने नकार,
प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
Published on
Updated on

बुलढाणा: मेहकर शहरातील ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर रस्त्यातच खुल्यावर एका महिलेची प्रसूती झाली. यावेळी मदतीसाठी रुग्णालयाबाहेर येण्यास कर्तव्यावरील परिचारिकेने नकार दिला. प्रसूती अडली असल्याने महिला वेदनांनी विव्हळत होती. अखेर परिस्थितीचे गांभीर्य पाहून एका खासगी रुग्णालयातील परिचारिकेला तेथे बोलावून प्रसूती करण्यात आली.केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे होमटाऊन असलेल्या मेहकर शहरात आरोग्य यंत्रणेचे असे धिंडवडे निघाल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,मेहकर शहरातील पिसे परिवारातील गरोदर महिलेला मंगळवार दि.२५च्या पहाटे प्रसूतीकळा जाणवू लागल्या. मदतीसाठी घरी कुणी हजर नसल्याने ही महिला पायी चालतच शहरातील ग्रामीण रुग्णालयाकडे निघाली. रूग्णालय अवघ्या ५० मीटर अंतरावर राहिले असतांना भोवळ येऊन ती खाली पडली.

रस्त्यावर अर्धवट प्रसूती झाल्याचे समजल्यानंतर महिलेच्या घराशेजारील योगेश सौभागे यांनी आपल्या कुटूंबातील महिलांसह तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. प्रसूती अडल्याने, महिलेच्या जीवाला धोका असल्याचे ओळखून सौभागे यांनी जवळच्याच ग्रामीण रुग्णालयातील कर्तव्यावरील परिचारिकेला मदतीसाठी येण्याची विनंती केली.

परंतू डाॅक्टर हजर नसल्याने रूग्णालयाबाहेर येण्यास तेथील परिचारिकेने नकार दिल्याचे सौभागे यांनी सांगितले. अखेर खासगी रुग्णालयातील परिचारिकेला बोलावून प्रसूती पार पडली व कठिण प्रसंगातून महिलेची सुटका झाली. नंतर नवजात बाळ व बाळंतिणीला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news