

बुलढाणा : शासकीय हमीभावाने शेतक-यांकडून खरेदी केलेला १६ लाख रु.किंमतीचा २७० क्विंटल हरबरा माल नियोजित ठिकाणी न पोहोचवता ट्रकसह फरार झालेल्या चालकावर धामणगाव बढे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लालमाती किन्होळा (ता.मोताळा)येथील 'नाफेड'च्या शेतमाल खरेदी केंद्रावर 'संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी' मार्फत शेतक-यांकडून शासकीय हमीभावाने खरेदी केलेल्या हरब-याचे प्रत्येकी ५० किलो वजनाचे ५४० पोते एकूण वजन २७०क्विंटल (किंमत १५ लाख,८६ हजार २५०रु.)हे वखार महामंडळाच्या मलकापूर स्थित गोदामापर्यंत पोहचवण्यासाठी ९ मेच्या दुपारी 'लकी ट्रान्सपोर्ट मलकापूर'च्या ट्रकद्वारे (क्र.एमएच ४३-यु-५२९०) पाठवण्यात आले होते.
मात्र तीन दिवसानंतरही (११मे पर्यंत) अवघ्या ५०कि.मी.अंतरावरील नियोजित ठिकाणी हा ट्रक न पोहोचल्याने संबंधितांना धक्काच बसला. शोधाशोध करूनही ट्रकचा काहीच सुगावा लागला नाही. लाखो रूपयांच्या हरबरा मालाची ट्रकचालक शेख आमीन शेख जलील (३३,रा.पारपेठ मलकापूर )याने परस्पर विल्हेवाट लावून,अपहार करून फसवणूक केल्याची शंका बळावल्याने अखेर शेतमाल खरेदी केंद्राच्या वतीने राजेंद्र जगले यांनी धामणगांव बढे पोलिसांत तक्रार दाखल केली.भा.न्या.सं.२०२३च्या कलम ३१६(३)अन्वये ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६लाखांच्या हरबरा मालासह ट्रकचालक फरार झाला आहे. एपीआय सुरेश सोनवणे पुढील तपास करीत आहेत.