

बुलढाणा,: अमरावतीहून मुंबईकडे दोन ट्रकमधून अवैधरित्या नेला जात असलेला १ कोटी १३ लाख रूपयांचा प्रतिबंधित गुटखा पकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ट्रक चालकासह तीन आरोपींना अटक केली आहे. मेहकर जवळ समृध्दी महामार्गाच्या फर्दापूर टोलनाक्यावर केलेल्या या कारवाईत तीस लाख रु.किंमतीचे दोन ट्रक ही जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिलेली माहिती अशी की,मानवी आरोग्यास हानिकारक असलेला गुटखा व तत्सम सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अमरावतीहून मुंबईकडे समृध्दी महामार्गावरून दोन ट्रक द्वारे अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेहकर पोलीस स्टेशन हद्दीत समृध्दी महामार्गाच्या फर्दापूर टोलनाक्यावर सापळा लावण्यात आला.
यावेळी गुटखा व सुगंधित पानमसाला भरलेले दोन संशयित ट्रक अडवून त्यांची झाडाझडती घेतली असता त्यात गुटखा पाऊण भरलेले एकूण २६४ पोते तपास पथकाला आढळून आले.या गुटख्याची किंमत १ कोटी १३ लाख ९हजार ७६०रु.आहे.या कारवाईत तीस लाख किंमतीचे दोन ट्रक जप्त करण्यात आले. आरोपी ट्रकचालक मोहम्मद इम्रान मोहम्मद हाफिज (२८)राहणार अचलपूर जि.अमरावती.अजीज बेग हाफिज बेग(३६)राहणार अमरावती,एजाज अहमद अजीज अहमद(३१)राहणार शिरजगाव जि.अमरावती या तीन आरोपींना गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.जिल्हा पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबूलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.