

बुलढाणा : भूखंडाच्या मोजणीसाठी केलेल्या ऑनलाईन अर्जातील कथित त्रुटी दूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना जळगाव जामोद तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना बुलढाणा 'एसीबी'च्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर कार्यालय परिसरात मोठी खळबळ उडाली.
एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने वडिलांच्या नावे असलेल्या भूखंडाची मोजणी करण्यासाठी शासकीय दराचे मोजणी शुल्क भरून भूमी अभिलेख कार्यालयात १७ जानेवारी २०२६ रोजी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज दाखल केला होता. या अर्जात काही त्रुटी असून त्या दूर करून देण्यासाठी कार्यालयातील परीक्षक भूमापक विश्वजीत सोनवणे (वय ५३) व मुख्यालय सहाय्यक सचिन सदाशिव वाजपे (वय ४८) या दोघांनी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), बुलढाणा कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, एसीबीच्या पथकाने मंगळवार, १२ मे रोजी जळगाव जामोद येथील भूमी अभिलेख कार्यालयात सापळा लावला. त्यावेळी विश्वजीत सोनवणे व सचिन वाजपे हे दोन कर्मचारी तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले.
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही लाचखोर कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. ही कारवाई बुलढाणा 'एसीबी'चे उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास घुशिंगे, पोहेका दीपक जाधव, अमोल जिने, शैलेश सोनवणे, रणजीत व्यवहारे, पंढरी शेळके आणि नितीन शेटे यांच्या पथकाने केली.