

बुलढाणा : बुलढाणा जिल्हा हा भक्ती-शक्तीचा सुरेख संगम आहे. जिल्ह्यातील कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रातील विकासातून जिल्ह्याची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी आज केले.
देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, बुलढाणा हे विदर्भाचे प्रवेशद्वार, भक्ती-शक्तीचा सुरेख संगम, स्वराज्याचे आजोळ आणि संत विचारांचे माहेरघर आहे. लखोजीराव जाधव यांच्या परिरात स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा जन्म सिंदखेडराजा या ऐतिहासिक गावी झाला असून हे मातृतीर्थ आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. जिल्ह्यात या चालू वर्षात १४ हजार हेक्टर क्षेत्रात फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी एक लाख बारा हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण करण्याचे नियोजन आहे. सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत पंचाहत्तर हजार हेक्टरपर्यंत सिंचन क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सन २०२३-२४ मध्ये खरीप व रब्बी हंगामातील ४९७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. अवेळी पाऊस, अतिवृष्टी ,पूर, आणि दुष्काळ बाधित नऊ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत ८१५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मदत व पुनर्वसन विभागामार्फत देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात एकूण ३५ हजार ३११ कोटी रुपयांचे सिंचन प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. या सिंचन प्रकल्पातून एक लाख बारा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाणारा १३९ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेचा वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प ८८ हजार ५७५ कोटी रुपये खर्चाचा असून, यामध्ये ३८६ मीटर लांबीच्या कालव्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. यात नळगंगा, कोलोरी आणि शेलोडी हे तीन प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. या प्रकल्पामुळे बुलढाण्यातील सुमारे ३८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
जिल्ह्यातील जिगाव, वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प, सिंदखेडराजा विकास आराखडा, ऐतिहासिक लोणार सरोवर विकास आराखड्यातील कामांना पुढील काळात गती देऊन पूर्ण करण्याचा आपला निर्धार आहे. जिल्ह्यात अकोला-खंडवा हा २३ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आणि जालना- खामगाव हा १६२ किलोमीटर लांबीचा रेल्वे प्रकल्प बांधणीचे काम लवकरच सुरु होणार आहे. तसेच बुलढाणा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीकरिता ४०३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्याचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. तसेच जळगाव जामोद येथे नवीन आयुर्वेद महाविद्यालयाकरीता जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून यास देखील लवकरच अंतिम मान्यता प्राप्त होणार आहे. लोणार सरोवर विकास आराखड्याची अंमलबजावणी सुरु असून सिंदखेडराजा विकास आराखड्यासाठी २३३ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आहे. अशी माहिती पालकमंत्री मकरंद पाटील यांनी यावेळी दिली.