बुलढाणा: समृध्दी महामार्गावर लुटमार करणारे ९ चोरटे जेरबंद

Buldhana crime News
बुलढाणा: समृध्दी महामार्गावर लुटमार करणारे ९ चोरटे जेरबंद File Photo

बुलढाणा: गेल्या काही दिवसांपासून समृध्दी महामार्गावर प्रवासी व मालवाहू वाहनांना लुटण्याच्या, वाहनातील डिझेल चोरण्याच्या घटना वाढल्या आहेत. चोरट्यांच्या उच्छादामुळे समृध्दी महामार्ग चर्चेत आलेला आहे. चोरट्यांचा छडा लावून अशा घटनांना आवर घालण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेपुढे उभे ठाकल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेची विविध पथके स्थापन केली आहेत.

दरम्यान, १० मे २०२४ च्या रात्री डोणगाव जवळ (ता.मेहकर) समृध्दी महामार्गालगत ऋषिकेश शिवाजी जगदाळे (वय-२८, रा.तेरखेडा ता.वाशी जि.धाराशिव) यांनी विश्रांतीसाठी त्यांचे वाहन मार्गावर उभे केले होते. त्यावेळी ३ अज्ञात चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम, सोने-चांदीचाऐवज व एक लैपटैप असा १लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जबरीने लुटून नेला होता. याबाबत डोणगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे.

वाहनातील लुटमारीच्या या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने गोपनिय व तांत्रिक माहितीच्याआधारे छडा लावून जालना जिल्ह्यातून ६ व मध्यप्रदेशातील ३ अशा एकूण ९ चोरट्यांच्या टोळीला नुकतेच जेरबंद केले आहे.

टोळीतील ९ संशयित आरोपींची नावे अशी आहेत. समीर नुर मोहम्मद मेव (२५), राकेश गुजल चंदेल (२१), धर्मराज विक्रम हरिजन (१९) तीघेही रा.दुपाडा (ता.जि.शहाजापूर, मध्यप्रदेश) व रावण उर्फ अभिषेक प्रताप गवारे (२१) रा.अंबड (जि.जालना), रंगनाथ बाजीराव बंडे (२५), विक्रम गोपाल राजपूत (३१) दोघेही रा.जालना, संतोष अंबादास वाघमारे (२४), राहूल राधाकिसन कोकाटे (२१), जावेद हबीब मुल्लानी (२९) तीघेही रा. गारखेडा (ता.जाफ्राबाद जि.जालना) या नऊही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

तपासादरम्यान या आरोपींनी बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव, देऊळगावराजा, मेहकर, सिंदखेडराजा, बिबी, धामणगाव बढे या पोलीस स्टेशन क्षेत्रात जबरी चोरीचे १४ गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news