

बुलडाणा : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या राज्यातील बुलडाणा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, वर्धा, अहिल्यानगर व ठाणे या सात जिल्हा सैनिक कल्याण मंडळांमध्ये गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात कथित आर्थिक घोटाळे झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य शासनाने तीन सदस्यीय उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे.
या चौकशी समितीचे अध्यक्ष निवृत्त उपसंचालक (कोषागार) अशोक जोशी आहेत. त्यांच्यासह संजीव मुळे आणि गिरीश दयाळ हे सदस्य आहेत. समितीला २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीत झालेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात माजी सैनिकांचे मेळावे, साहित्य खरेदी, काही अधिकाऱ्यांनी दुहेरी महागाई भत्त्याचा घेतलेला लाभ, विशेष निधी, कल्याणकारी निधी व प्रोत्साहन निधीमधील कथित आर्थिक घोटाळ्यांची चौकशी होणार आहे.
समितीला दोन महिन्यांत आपला सत्यशोधन अहवाल शासनाला सादर करावयाचा आहे. यामुळे सैनिक कल्याण मंडळांतील काही अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. संभाव्य कारवाईच्या भीतीने त्यांचे धाबे दणाणले आहेत.