बुलढाणा : अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; नराधम शिक्षक गजाआड | पुढारी

बुलढाणा : अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; नराधम शिक्षक गजाआड

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थीनी व शिक्षक यांच्यातील गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना बुलढाणा शहरात उघडकीस आली. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणा-या नराधम शिक्षकाला शहर पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी आहे की, बुलढाणा लगतच्या मोताळा तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेवर आरोपी शिक्षक कार्यरत होते. याच शाळेतील पिडित विद्यार्थीनीने गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्याने या बुलढाणा शहरातील एका शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर ती वसतीगृहात राहत होती. आरोपी शिक्षकाने तिच्या बुलढाण्यातील शाळेच्या वाटेवर उभे राहून तिच्याशी संवाद साधू लागला. यावेळी त्याने पीडित तरुणाला मागीलवर्षीचे शाळेतील कार्यक्रमादरम्यान तुझे कपडे बदलतानाचे फोटो माझ्याकडे आहेत ते तुला दाखवायचे आहेत असे सांगून त्याचे  चारचाकीमध्ये बसवून राजूर घाटाकडे नेले. इतरांना फोटो दाखवून बदनामी करेन अशी धमकी देत आरोपीने अल्पवयीन विद्यार्थिनीवर कारमध्येच लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तीन वेळा त्याने असा प्रकार केला. त्यानंतर पुन्हा पुन्हा आरोपी शिक्षकाने पीडित तरुणीवर बदनामीची धमकी देऊन अत्याचार केले. पिडित विद्यार्थीनीने अखेर तिच्या आईला ही घटना सांगितले. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात  लैंगिक छळाची तक्रार दिली. पोलीसांनी आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपी शिक्षकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

Back to top button