

Buldhana Cannabis Seized From Farm
बुलढाणा : एका शेतक-याने तुरीच्या उभ्या पिकामध्ये लावलेली प्रतिबंधित गांजाची ३२ किलो ७५१ग्राम वजनाची झाडे ( किंमत ३.८५लाख) एलसीबीच्या पथकाने जप्त करून आरोपीला अटक केली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील मेव्हणा राजा शिवारात ही कारवाई करण्यात आली.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या सुत्रांनी सांगितले की, मेव्हणा राजा गावातील विष्णू सुखदेव बोरूडे (वय३९) या शेतक-याने त्याच्या मालकीच्या शेतात तुरीच्या उभ्या पिकामध्ये प्रतिबंधित गांजाची अवैधरित्या लागवड केली. चोरट्या मार्गाने त्याची विक्री करण्याच्या बेतात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली.
त्यानुसार, १५ डिसेंबररोजी संबंधित शेतात एलसीबीच्या पोलीस पथकाने पंचासमक्ष छापा टाकून आरोपी शेतकरी विष्णू बोरूडे याच्या ताब्यातील ओलसर गांजाची २८ किलो ५१ ग्राम वजनाची झाडे (किंमत २ लाख ८५ हजार १००) व गांजाची सुकलेली ४ किलो ७०० ग्रॅम वजनाची झाडे किंमत ९४ हजार असा एकूण ३ लाख ८५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हा दाखल करुन आरोपी विष्णू बोरूडे याला अटक केली.एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबूलकर यांच्या नेतृत्वाखाली एपीआय यशोदा कणसे, राजकुमार राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.