नागपूर, पुढारी वृत्तसेवा : स्थानिक यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका 32 वर्षीय गतिमंद महिलेचा मृतदेह आज मौदा परिसरात कन्हान नदीपात्रात आढळून आल्याने खळबळ माजली. या महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय असून डोक्याला मार आहे.
मृतदेह मेयो रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी आणण्यात आल्यानंतर तिथे आणि नंतर या संतापजनक घटनेचे वृत्त कळताच रात्री उशिरा यशोधरानगर पोलीस स्टेशनवर परिसरातील दोनशेवर नागरिकांचा मोठा जमा चालून आला. सातत्याने शहरात रोज हत्येच्या घटना होत असल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे अशी मागणी जमावाने केली. या प्रकरणाचे सत्य लवकरच उघडेल असे घटनास्थळी आलेल्या पोलीस उपायुक्त यांचेमार्फत आश्वासन देण्यात आल्यानंतर जमाव शांत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.