भंडारा : नोकाराशी शाब्दिक चकमकीचे पर्यवसान मारहाणीत झाले. त्यानंतर रागाच्या भरात मालकाने तीन मित्रांच्या सहाय्याने नोकराचा धारदार शस्राने खून केला. त्यानंतर चारचाकी वाहनातून त्याचा मृतदेह दाभा परिसरातील नदीत फेकला. ही घटना गुरूवारी (दि.२१) मध्यरात्री वरठी येथे घडली. शिवगोपाल शालिक बावनकर (वय ४२, रा अर्जुनी ता. तिरोडा हल्ली मुक्काम वरठी) असे मृताचे नाव आहे.
वरठी बायपास रस्त्यावर पडोळे भोजनालयात शिवगोपाल बावनकर हा दोन महिन्यांपासून कामाला होता. व्यवस्थितरित्या काम करत नसल्याच्या कारणावरून मालकात व नोकरात नेहमी खटके उडत होते. त्यानंतर मालकाने त्याला कामावर येण्यास मनाई केली होती. घटनेच्या दिवशी कामावर असताना राजेंद्र उर्फ शेखर रामजी पडोळे या मालकाशी त्याचा पुन्हा वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. यावेळी मालकाने त्याच्या तीन मित्राच्या साहायाने नोकराच्या गळा चिरून खून केला. ही घटना गुरूवारी (दि.२१) रात्री १ ते २ च्या दरम्यान घडली. रागाच्या भरात खून झाल्याने गोंधळलेल्या चौघांनी मृतदेह त्यांच्या वाहनात टाकून नजीकच्या दाभा नदीच्या पुलावरून नदीत फेकला. खुनाचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने वाहनाला अज्ञात स्थळी लपवून घटनास्थळावरून पसार झाले. नदीपात्रात मृतदेह असल्याची माहिती मिळताच वरठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून मृतदेह नदीतून बाहेर काढला. गळ्यावर गंभीर जखम असल्याने गळा चिरून खून झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर पडोळे भोजनालयाचा मालक राजेंद्र उर्फ शेखर रामजी पडोळे ( वय ४५, रा केसलवाडा) त्याचे मित्र चेतन धनराज साठवणे ( वय ३१) आशिष अनिल वाघमारे (वय ३०, दोघेही रा.सिरसी) व मयूर उर्फ शुभम खोब्रागडे (रा. वरठी) या चौघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी नातेवाईक प्रवीण दिलीप भुरे यांच्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाचा तपास पोलिस निरीक्षक अभिजित पाटील करत आहेत.