

Mitewani young man killed
भंडारा: तुमसर तालुक्यात हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच कटंगी मार्गावरील मिटेवानी शिवारात रविवारी (दि.९) सकाळी आणखी एका गंभीर अपघाताने ग्रामस्थांना हादरवून सोडले.
मजुरीसाठी सायकलवरून निघालेल्या अनिल सायरू बांगरे ( वय २८, रा. साखळी-पोवार) या युवकाला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, अनिलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेने साखळी गावात संतापाची लाट पसरली असून अवैध रेती वाहतूक थांबविण्याची मागणी जोर धरत आहे. रविवारी पहाटे ६.३० वाजताच्या सुमारास अनिल बांगरे हा आपल्या सायकलवरून बेलदारी मजुरीसाठी तुमसरकडे निघाला होता. साखळी वळणमार्गावरून जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जबर धडक दिली. धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की, अनिल डोक्याला गंभीर मार लागून जागीच ठार झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जितेंद्र बंडू बांगरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हिट अँड रनचा गुन्हा नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.