

भंडारा: नापिकी व बँक, सोसायटीमधून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शक्य होत नसल्याने एका २६ वर्षीय तरुण शेतकर्याने घरीच गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील तावशी येथे घडली. नितीन देवचंद राखडे (वय २४) रा. तावशी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नितीन हा अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्याकडे दीड एकर शेती आहे. शेतात बोरविहीरच्या माध्यमातून सिंचन सुविधा असल्याने त्या शेतीत दरवर्षी रब्बी व खरीप असे दोन उत्पन्न घेत होता. त्याने दोन वर्षांपूर्वी बँक व सोसायटीकडून कर्ज घेतले होते. मात्र त्यावर्षी एवढे कमी उत्पन्न मिळाले की शेतीला लावलेले खर्चही निघाले नाही. उलट बँक व सोसायटीचे कर्जात वाढच झाली. पुन्हा उधारउसने करून रब्बी धान पिकाची लागवड केली. मात्र वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतीला सिंचन करणे शक्य नाही. तर वातावरण बदलाचासुद्धा शेत पिकाला फटका बसल्याने रोगराईने धान पीकसुद्धा फस्त झाले. त्यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, या आर्थिक व मानसिक विवंचनेत असलेल्या नितीनने स्वत:च्या राहत्या घरी स्वयंपाक खोलीमध्ये गळफास घेवून जीवनयात्रा संपविली.