

भंडारा: जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाचे भंडारा येथील दोन ठिकाणांवरील कामांना जलसंपदा विभागाने स्थगिती दिली. त्यातच मौदी येथे साकारत असलेल्या मुख्य जलपर्यटनाचे कामही अत्यंत संथ गतीने सुरू आहे. मुख्य जलपर्यटनाचे २० टक्केही काम झाले नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भंडारा तालुक्यातील मौदी या वैनगंगेच्या काठावरील गावाजवळ जागतिक दर्जाचे जलपर्यटन प्रकल्पाचे काम सुरू आहे. भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विशेष पुढाकारातून जून २०२४ मध्ये या जलपर्यटनाचे भूमिपूजन मौदी या गावी तत्कालिन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज १८ महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा प्रकल्पाचे २० टक्केही काम पूर्णत्वास आलेले नाही.
या प्रकल्पासाठी राज्य शासनाने १०२ कोटींचा निधी दिला. भूमिपूजनानंतर प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. सध्या, मौदी येथे वैनगंगा नदीकाठावर आवारभिंतीचे काम सुरू आहे. पर्यटकांसाठी ‘व्ह्यु’ पॉर्इंट तयार होत आहे. त्यासाठी लोखंडी खांब उभे केले गेले आहेत. त्या शेजारी पर्यटकांसाठी उपहारगृहाचे बांधकाम सुरू असून लोखंडी स्ट्रक्चर तेवढा उभा आहे.
या प्रकल्पाला भेट दिली तेव्हा फक्त दोन ते तीन मजूर कामावर असल्याचे दिसून आले. प्रकल्पाचे साहित्य विखुरलेल्या स्थितीत होते. सर्वत्र मातीचे ढिगारे पडून होते. इतक्या मोठ्या प्रकल्पाची गती अत्यंत संथ दिसून आली. आता १८ महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रकल्पाला गती आलेली नसल्याने प्रत्यक्षात जलपर्यटन सुरू होण्यासाठी आणखी बराच विलंब होण्याची शक्यता आहे.
मोदी हे गाव आंभोरा पुलाच्या अलीकडे आहे. शेजारी जागतिक दर्जाचा वैनगंगेवरील पूल आणि त्यानंतर आंभोरा देवस्थान आहे. हे जलपर्यटन पूर्णत्वास आल्यास भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील एक ‘टूरिझम सर्किट’ पूर्ण होणार आहे. परंतु, त्यासाठी आणखी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
या जलपर्यटनासाठी भंडारा, मौदी या नदीकाठावरील गावांजवळ प्रवेशमार्ग (प्लॅटफॉर्म) असणार आहेत. एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणापर्यंत बोटींतून प्रवास होणार आहे. लागूनच आंभोरा तीर्थक्षेत्र आहे. बोटीतून प्रवास करुन एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी पर्यटकांना आनंद लुटता येणार आहे.
भंडाऱ्यातील जलपर्यटन स्थगित
जलपर्यटनातंर्गत भंडारा येथेही वैनगंगेच्या काठावर या प्रकल्पाचे काम सुरू होते. परंतु, भंडारा येथील ऑफीसर्स क्लबच्या मागे आणि कारधा पुलाजवळील वैनगंगा नदीकाठावर सुरू असलेले हे काम जलसंपदा विभागाची परवानगी नसल्याने स्थगित करण्यात आले. त्यामुळे ही दोन्ही कामे आता ठप्प आहेत. दुसरीकडे, मुख्य जलपर्यटन प्रकल्पाचे कामही धिम्या गतीने सुरू असल्याने या प्रकल्पाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.