

भंडारा : मध्यप्रदेशला जोडणाऱ्या बपेरा आंतरराज्य सीमेवर नाकाबंदी दरम्यान सिहोरा पोलिसांनी सुगंधित तंबाखू जप्त करत मोठी कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक नितीन मदनकर यांच्या पथकाने ही कारवाई करत १४ लाख १९ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी राहुल अशोक प्रजापती (वय २९), आकाश मनोज कळपती (वय २०), शनी राजेंद्र वाढीवे (वय १९) सर्व रा. वाराशिवनी, श्याम सेठ रा. बालाघाट (मध्यप्रदेश) आणि रोहीत हरिप्रसाद पांडे रा. तुमसर यांच्या विरोधात सिहोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे सुगंधित तंबाखू विक्रेते आणि पान मसाला, गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
बपेरा आंतरराज्य सीमेवरून मध्यप्रदेशातून अवैध साहित्याची आयात महाराष्ट्रात करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार या सीमेवर नाकाबंदी करत वाहनांची पोलिसांकडून तपासणी सुरू होती. यादरम्यान चारचाकी वाहन (क्र. एमपी ५० जी १६५९) या वाहनाची तपासणी केली असता वाहनात सुगंधित तंबाखू आढळून आली. १४ लाख १९ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई सहायक पोलिस उपनिरीक्षक हरिराम सूरपाम, राजू साठवणे, तिलक चौधरी, नीलेश गजाम, महेश गिन्हेपुंजे, संतोष सिदने, गजानन तिरकाडे यांनी केली.